Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अवैध वाळू प्रकरणी सलग 24 तास कारवाई
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: re3
फलटणमध्ये वाहनांसह दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
5फलटण, दि. 30 : फलटण तालुक्यातून एकही कण वाळू अथवा इतर कोणतेही गौणखनिज चोरीस जाणार नाही, असा निर्धार व्यक्त करत फलटणचे तहसीलदार विजय पाटील यांनी नुकतीच मोठ्या प्रमाणावर छापे टाकून बेकायदेशीर वाळू वाहतूक करणार्‍या वाहनांवर कारवाई केली. अनधिकृत वाळू उपसा प्रकरणी 3 पोकलेन, 2 ट्रक, 1 ट्रॅक्टर असा एकूण 1 कोटी 91 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या कारवाईची सुरुवात पहाटे 3 वाजता बरड, आंदरुड, जावली, मिरढे या भागात करण्यात आली. या भागात चोरटी वाळू वाहतूक करणारा एक ट्रॅक्टर व दोन ट्रॉली अशी वाहने पकडण्यात आली. ही वाहने ताब्यात घेऊन ती फलटण पोलीस ठाण्यात जमा करण्यात आली. नंतर तहसीलदार विजय पाटील यांनी आपला मोर्चा पाडेगावकडे वळवला. वाळू वाहतूक करणारे लोक शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान करत आहेत, अशी तक्रार पाटील यांच्याकडे नुकतीच आली होती. या तक्रारीची तत्काळ दखल घेत तहसीलदारांनी पाडेगाव येथे जाऊन नीरा नदीस मिळणार्‍या आणि फलटण व खंडाळा तालुक्याच्या सीमेवरील ओढ्यात मोठ्या प्रमाणावर वाळू उत्खनन सुरु असल्याचे निर्दशनास आले. तेथे एकूण चार मोठ्या पोकलेन मशीनच्या सहाय्याने रवाळू उपसा सुरू होता. या प्रकारचे गांभीर्य लक्षात घेवून आणि शेतकरी बांधवांना न्याय देण्यासाठी तहसीलदारांनी तत्काळ कारवाई करुन चारही पोकलेन मशीन जप्त केल्या.
वाळू व्यावसायिक मशीनचा ताबा घेऊन देत नव्हते तरी त्यांचा विरोध न जुमानता कठोर भूमिका घेवून या पोकलेन मशीन लोणंद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. ही मशीन जमा करण्याचे आव्हान होते. खाजगी मोठा ट्रेलर उपलब्ध करुन व या मशीन चालवण्यासाठी खाजगी चालक उपलब्ध करुन त्या मशीन लोणंद पोलीस ठाण्यात जमा करण्यात आल्या. तोपर्यंत रात्रीचे आठ वाजले होते. तहसीलदार व त्यांच्या सहकार्‍यांनी दिवसभर ओढ्याच्या पात्रात उभे राहून ही कारवाई केली. त्यानंतर खडकी-मलवडी भागात वाळू उपसा सुरू असून दोन ट्रक वाळू धुण्यासाठी आल्याची तक्रार तहसीलदारांना मिळाली. या तक्रारीची तत्काळ दखल घेवून तहसीलदारांनी खडकी तलाव परिसराकडे धाव घेतली. तलाव परिसरात जाईपर्यंत रात्रीचे दहा वाजले होते. खडकी तलावात दोन ट्रकमधील वाळू धुवून घेतली जात असल्याचे आढळून आले. हे ट्रक ताब्यात घेऊन ते फलटण येथे पोलीस ठाण्यात जमा करण्यात आले. ही कारवाई संपेपर्यंत रात्रीचा 1 वाजला होता. साधारणपणे 24 तास सलग कारवाई करण्यात आली.  
ही कारवाई सुरू असताना उपविभागीय अधिकारी संतोष जाधव हे मार्गदर्शन करत होते आणि पोलीस प्रशासनाची मदत महसूल यंत्रणेस देत होते. या करवाईत तहसीलदारांना मंडलाधिकारी विलास जोशी (तरडगाव) व डी. एस. पवार (फलटण) यांनी सहकार्य केले. तलाठी लक्ष्मण अहिवळे, संतोष नाबर, योगेश धेंडे, सचिन जाधव, धायगुडे, शिवाजी अडसूळ, राजेंद्र पंडित, गोळे, फिरोज अंबेकरी यांनी कारवाईत भाग घेतला. फलटण तालुक्यात गौण खनिजाचा बेकायदेशीर व्यवसाय कोण करत असेल तर त्याबाबतत महसूल अधिकारी व कर्मचार्‍यांना माहिती द्यावी. त्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल, असे आवाहन तहसीलदार विजय पाटील यांनी केले आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: