Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
प. महाराष्ट्र देवस्थान समिती विधेयक हिवाळी अधिवेशनात मांडणार
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) : पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या संदर्भातील कायद्याचे विधेयक याच हिवाळी अधिवेशनात मांडण्याच्या दृष्टीने तयारी करा, असे आदेश महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. चंद्रकांत पाटील यांनी या कायद्याच्या मसुद्याबाबत मंत्रालयात गुरुवारी बैठक घेतली. सर्व संबंधित अधिकारी या बैठकीस हजर होते.
देशविदेशातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कोल्हापूर येथील श्री अंबाबाई मंदिराच्या कारभाराबाबतची लक्षवेधी सूचना विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात मांडण्यात आली होती. मंदिरात बडव्यांनी चालवलेल्या लुटीचा पाढाच कोल्हापूरमधील आमदारांनी वाचला होता. तेव्हा सरकारने पंढरपूर-शिर्डी देवस्थानच्या धर्तीवर कोल्हापूर अंबाबाई देवस्थानसाठीही स्वतंत्र कायदा करण्याची आणि बडव्यांच्या जागी पगारी पुजारी नेमण्याची घोषणा केली होती.
विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरपासून नागपूर येथे सुरू होत आहे. याच अधिवेशनात हे विधेयक मांडण्यात येणार आहे. त्याबाबतचा आढावा चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीत घेतला.
अध्यादेश काढण्याचीही सरकारची तयारी
नागपूर अधिवेशन 11 डिसेंबरपासून सुरू होणार आहे. सध्या तरी अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज 10 दिवसच चालणार आहे. इतक्या कमी कालावधीत सगळी विधेयके मांडता येतील का याबाबत साशंकताच आहे. त्यामुळे विधेयक मांडण्यास पुरेसा कालावधी मिळाला नाही तर सरकारने याबाबतचा अध्यादेश काढण्याचीही तयारी सुरू केली आहे.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: