Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विधानपरिषद निवडणूक अटळ
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: mn3
प्रसाद लाड-दिलीप माने यांच्यात सरळ लढत
5मुंबई, दि. 30 (प्रतिनिधी) : 7 डिसेंबरला होणार्‍या विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दिलीप माने यांच्यात लढत होणार असल्याचे आज स्पष्ट झाले आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवशी दोन्ही उमेदवारांचे अर्ज कायम राहिल्याने निवडणूक होणार असून भाजपचे पारडे जड असले तरी मतांची फाटाफूट होऊ नये यासाठी बरीच मेहनत घ्यावी लागणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. विजयासाठी 145 आमदारांचे पाठबळ लागणार असून पुरेसे संख्याबळ नसताना काँग्रेस आपला उमेदवार रिंगणात ठेवणार का याबाबत शंका व्यक्त केली जात होती; परंतु युतीतील नाराजीमुळे मते वाढण्याची शक्यता असल्याने दिलीप माने यांची उमेदवारी कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. काँग्रेस व राष्ट्रवादीची 83 मते असून अन्य सात आमदार विरोधी पक्षांबरोबर आहेत. भाजप-शिवसेनेची 185 मते असून त्यांना सात अपक्ष व अन्य पाच आमदारांचा पाठिंबा आहे. राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार रामनाथ कोविंद यांना 205 मते मिळाली होती. कागदावर प्रसाद लाड यांची बाजू भक्कम असून ते सहज निवडून येतील, असे दिसत असले तरी युतीतील नाराजीमुळे मताधिक्य घसरण्याची शक्यता आहे.
वर्षानुवर्षे पक्षाचे काम करणार्‍या इच्छुकांना डावलून पुन्हा एकदा राष्ट्रवादीतून आयात केलेला उमेदवार लादल्याने भाजपमध्ये नाराजी आहे. नारायण राणे यांना कात्रजचा घाट दाखवून प्रसाद लाड यांना उमेदवारी दिल्याने शिवसेनेने पाठिंबा दिला असला तरी सरकारकडून मतदारसंघातील कामे होत नसल्याने शिवसेनेचे अनेक आमदार नाराज आहे. गुप्त मतदानातून त्यांची नाराजी व्यक्त होऊ शकते. त्यामुळे निवडणुकीचा निकाल बदलला नाही तरी मते फुटल्यास सरकारला नामुष्की पत्करावी लागू शकते.   
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीत संख्याबळानुसार मते न मिळाल्याने विरोधकांवर ही वेळ आली होती. त्यामुळे प्रसाद लाड यांचा विजय सहज असला तरी या निवडणुकीत काही ‘अदृश्य बाण’ मदत करतील, अशी अपेक्षा काँग्रेसला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: