Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘गेला बिबट्या कुणीकडे?’
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:16 AM (IST)
Tags: re1
सोशल मीडियावर अफवा अन् घबराट
5फलटण, दि. 30 : फलटण शहरात गेल्या तीन दिवसांपासून बिबट्याचा वावर असल्याच्या बातमीने संपूर्ण शहर नव्हे तर तालुकाही हादरला असून विद्यार्थी व महिला वर्गात प्रचंड घबराट पसरली आहे. त्यातच सोशल मीडियातून अफवांचे पेव फुटल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली असून ‘गेला बिबट्या कुणीकडे’ असे म्हणत वनाधिकारी, पोलीस, सामाजिक व राजकीय कार्यकर्ते शोधाशोध करत आहेत.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी गेल्या तीन दिवसांपासून वाघसदृश प्राणी दिसल्याचे सांगितले तरी प्रथम त्याचे गांभीर्य कोणाला वाटले नाही. दुसर्‍या दिवशीही आणखी एकाने वाघ पाहिल्याचे सांगितले. मग, वन विभागाच्या अधिकार्‍यांनी मनावर घेऊन शोध सुरू केला. कृष्णनाथ मंदिरामागील बाणगंगा नदीपात्र, मुधोजी कॉलेजपर्यंत शोध घेतला; परंतु त्यांना यश आले नाही. त्यामुळे हा वाघ नसावा असा कयास वन अधिकार्‍यांनी केला. प्रथम वाघ बघितलेल्या नागरिकाने स्वेटर घातलेले कुत्रे पाहिले असावे, अशा अफवांचे पेव फुटले. तशी काही अधिकार्‍यांचीही समजूत झाली. मात्र, फलटणच्या गजानन चौकातील सिनेमागृहाचे सीसीटीव्ही फुटेज एकदमच पोलिसांकडे आले आणि नंतर सोशल मीडियावर झळकले. तो बिबट्याचा बछडा असावा, असे वनाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. घटनेचे गांभीर्य ओळखून सातारा येथील वनाधिकारी फलटणमध्ये दाखल झाले. वनाधिकारी शोध घेत असतानाच शहरातील मध्यवर्ती ठिकाणी स्वामी समर्थ मंदिर, दगडी पूल येथे बिबट्याचा आवाज ऐकल्याचेकाही महिलांनी सांगितल्याने  नगरसेवक अजय माळवे यांनी तातडीने डीवायएसपी रमेश चोपडे व वनाधिकारी घाडगे यांच्याशी संपर्क साधून तेथे शोध घेण्याची विनंती केली. त्याप्रमाणे वनाधिकारी व पोलिसांनी तेथे सुमारे दोन तास शोधमोहीम राबवली. बघ्यांच्या गर्दीमुळे शोधकार्यात अडथळे येत होते. नूतन पोलीस निरीक्षक सावंत यांनी गर्दीस अटकाव करत वनाधिकार्‍यांना सहकार्य केले; परंतु येथेही अपयश आले. बिबट्या सापडलाच नाही. रात्र झाल्यानंतर शोधमोहीम थांबविण्यात आली. फलटणकरांनी मात्र भीतीयुक्त वातावरणात न झोपताच रात्र काढली.
दरम्यान, नगरपालिकेने जाहीर आवाहन करून नागरिकांना सतर्क राहण्यास सांगितले. पहाटे येणारे पाणी उशिरा सोडल्यामुळे महिला वर्गास दिलासा मिळाला. गुरुवारी मात्र सकाळपासून बिबट्या कोणी बघितल्याचे ऐकिवात आले नाही. बिबट्या असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमुळे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फलटण परिसरात बिबट्याचा वावर आहे, यात शंकाच नाही; परंतु कोणालाही इजा पोहोचू नये म्हणून वन विभागाने सतर्कता बाळगून बिबट्याचा शोध घ्यावा आणि नागरिकांची भीतीतून मुक्तता करावी, अशी मागणी होत आहे बिबट्या दाखल झाल्यापासून सोशल मीडियावर येणारे मेसेज अत्यंत चुकीचे व खोटे आहेत. ‘गिरवी नाक्यावर बिबट्या दिसला’, ‘सराफाच्या विहिरीत बिबट्या जेरबंद’ अशा क्लिप्स पूर्णपणे खोट्या असून अशा अफवांवर कोणीही विश्‍वास ठेवू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: