Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
काश्मीर खोर्‍यात पाच दहशतवाद्यांना कंठस्नान
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: na1
वर्षभरात तब्बल दोनशे दहशतवाद्यांचा खात्मा
5श्रीनगर, दि. 30 (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीरमधील बडगाम व बारामुल्ला येथे गुरुवारी झालेल्या दोन चकमकींमध्ये पाच दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. या चकमकीत एक जवान आणि एक स्थानिक मुलगा असे दोन जण जखमी झाले आहेत. ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांमध्ये ‘जैश-ए-मोहम्मद’च्या दोन ते तीन दहशतवाद्यांचा समावेश आहे. दरम्यान, या वर्षात आतापर्यंत दोनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी दिली आहे. काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या गेल्या सात वर्षांत प्रथमच दोनशेच्या वर गेली आहे.
बडगाम जिल्ह्यातील फुटलीपोरा गावात लष्कर, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि बडगाम पोलिसांच्या संयुक्त पथकाची दहशतवाद्यांबरोबर गुरुवारी सकाळी चकमक सुरू झाली. फुटलीपोरा गावातील पाखेरपोरा चौकात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांच्या जवानांनी या परिसराला वेढा घातला. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्याने चकमकीस सुरुवात झाली. या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. त्यात ‘जैश’च्या दोन ते तीन दहशतवाद्यांचा समावेश आहे. ही चकमक सुरू असताना या भागात लष्कराची आणखी कुमक धाडण्यात आली. लष्कराचे पथक त्या भागाकडे निघाले असताना स्थानिक नागरिकांनी या पथकावर दगडफेक केली. त्यामुळे जवानांनी हवेत गोळीबार केला. त्यात सिनार अहमद हा 15 वर्षांचा मुलगा जखमी झाला आहे.  
आणखी एका घटनेत बारामुल्ला येथील सोपोर भागात काही दहशतवाद्यांबरोबर लष्कराच्या जवानांची चकमक झाली. त्यामध्ये एका दहशतवाद्याला ठार करण्यात आले. या भागात आणखी काही दहशतवादी लपले असून तेथे उशिरापर्यंत चकमक सुरू होती. या चकमकीत लष्कराचा एक जवान जखमी झाला आहे. दहशतवादी सागीपोरा गावात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने तेथे मोहीम राबवली. या भागात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. दहशतवाद्यांबरोबर चकमक सुरू झाल्यानंतर बडगाम आणि पुलवामा जिल्ह्यांमधील इंटरनेट आणि मोबाइल सेवा बंद करण्यात आली आहे.
आतापर्यंत दोनशे दहशतवादी ठार
दरम्यान, सुरक्षा दलांच्या कारवाईत या वर्षी आतापर्यंत दोनशेहून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे, अशी माहिती जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी ट्विटरद्वारे दिली. गेल्या सात वर्षांत प्रथमच ठार झालेल्या दहशतवाद्यांची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, असे वैद यांनी या ट्विटमध्ये म्हटले आहे. आपल्या देशात आणि जम्मू-काश्मीरमध्ये शांतता व स्थैर्य प्रस्थापित होण्याच्या दृष्टीने हा मैलाचा दगड ठरला आहे, असे त्यांनी आणखी एका ट्विटमध्ये म्हटले आहे. अधिकृत आकडेवारीनुसार सुरक्षा दलांनी 1 जानेवारीपासून आतापर्यंत दोनशेपेक्षा जास्त दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. 2010 पासून प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत. 2010 मध्ये सुरक्षा दलांनी तब्बल 270 दहशतवाद्यांना
यमसदनी धाडले होते. 2015 मध्ये ठार झालेल्या
दहशतवाद्यांची संख्या अवघी 100 होती. गेल्या वर्षी नियंत्रण रेषा आणि काश्मीर खोर्‍यात एकूण 165 दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले होते.
यंदा दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकींच्या वेळी स्थानिकांनी दगडफेक करण्याच्या घटना वाढल्या आहेत. या आंदोलकांना पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी केलेल्या गोळीबारात एकूण 54 स्थानिक नागरिक मारले गेले आहेत. गेल्या वर्षी ही संख्या अवघी 14 होती. यंदाच्या वर्षांत सुरक्षा दलांची जीवितहानीही कमी झाली आहे. गेल्या  वर्षी दहशतवाद्यांविरोधातील कारवायांमध्ये 88 जवान हुतात्मा झाले होते तर यंदा 77 जवानांना वीरमरण आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: