Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
निर्णयांची राजकीय किंमत चुकवण्यास तयार
ऐक्य समूह
Friday, December 01, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: na3
 भ्रष्टाचारविरोधी लढाई   सुरूच ठेवणार : मोदी
5नवी दिल्ली, दि. 30 (वृत्तसंस्था) :नोटाबंदी, जीएसटीमुळे भ्रष्टाचाराला चाप बसला आहे. या निर्णयावर विरोधक टीका करत असून जनतेत चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत. भ्रष्टाचार संपवण्यासाठी सत्तेत आल्यापासून पंतप्रधान म्हणून अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. भ्रष्टाचाराविरोधी या लढ्याची राजकीय किंमत चुकवण्यासही मी तयार आहे. मात्र, हा लढा पुढे सुरूच ठेवणार आहे. आता एक पाऊलही मागे हटणार नाही, असा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. नवी दिल्लीतील एका परिषदेत बोलताना मोदींनी भ्रष्टाचार रोखण्यासाठी सरकारने घेतलेल्या निर्णयांची माहिती दिली.
मोदी म्हणाले, भ्रष्टाचाराविरोधात घेतलेल्या भूमिकेची, भ्रष्टाचार रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयांची राजकीय किंमत मला चुकवावी लागू शकते. ती किंमत चुकवण्यास मी तयार आहे. माझ्या सरकारचा हेतू अतिशय प्रामाणिक आहे. भ्रष्टाचाराविरोधात आम्ही प्रामाणिकपणे काम करत आहोत. त्यासाठीच देशातील जनतेने आम्हाला निवडून दिले, असेही ते म्हणाले. नोटाबंदीचा निर्णय यशस्वी झाला आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा उजेडात आला. काळ्या पैशाची समांतर अर्थव्यवस्था संपुष्टात आली. नोटाबंदीमुळे लोकांच्या वर्तणुकीतही बदल झाला आहे. लोकांची सकारात्मकता कधी नव्हे एवढी वाढली आहे, असा दावा त्यांनी केला.
मी देशासाठी एक ध्येय निश्‍चित केले आहे. ते गाठण्यासाठी ज्या मार्गावरून चाललो आहे, त्याची मोठी राजकीय किंमत मोजावी लागेल, याची मला कल्पना आहे; पण आता एक पाऊलही मागे हटणार नाही,’ असे ते म्हणाले. देशात परिवर्तन व्हावे यासाठी 2014 मध्ये आम्हाला मते दिली होती. सव्वाशे कोटी जनतेचा विश्‍वास हाच देशाच्या विकासाचा पाया आहे. देशातील गरीब, तरुण, महिला आणि शेतकर्‍यांनी या आधी इतका विश्‍वास कोणावरही ठेवला नव्हता. आगामी काळात रोकडरहित व्यवहारांमध्ये वाढ होणार असून त्यामुळे काळ्या पैशाला लगाम लागेल, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. 
जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे करप्रणाली पारदर्शक आणि सुटसुटीत झाली आहे. यापुढे बेनामी संपत्तीविरोधातील कारवाईमध्ये आधारकार्ड हे मोठे माध्यम असेल, असे मोदींनी सांगितले. त्यांनी तत्कालीन यूपीए सरकारवरही तोफ डागली. आम्ही 2014 मध्ये सत्तेत आलो, तेव्हा संकटात सापडलेली अर्थव्यवस्था आम्हाला वारसा म्हणून मिळाली. बँकिंग क्षेत्र अडचणीत होते. समस्यांच्या गर्तेत सापडलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा समावेश होत होता, अशा शब्दांमध्ये मोदींनी काँग्रेस सरकारवर निशाणा साधला.
आता भारतीय ताठ मानेने परदेशात जगत आहेत. ‘अब की बार कॅमेरून सरकार’, ‘अब की बार ट्रम्प सरकार’ अशा घोषणांमधून भारताबद्दलचा वाढता विश्‍वास दिसून येतो, असेही मोदी म्हणाले. मोदींनी आपल्या टीकाकारांनाही उत्तर दिले. जादूची कांडी फिरवून देशातील परिस्थिती बदलू शकत नाही, असे वाटणारे निराशावादी असतात. मात्र, अशा लोकांमुळे आम्ही हातावर हात ठेवून बसू शकत नाही. आम्ही जोखीम पत्करण्यासाठी तयार आहोत. या सरकारची मानसिकता वेगळी आहे, अशा शब्दांमध्ये मोदींनी टीकाकारांना उत्तर दिले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: