Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सहा डंपर व वाळूसह सुमारे तीस लाखाचा ऐवज जप्त
ऐक्य समूह
Thursday, November 30, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: re5
महसूल विभागाची औंध येथे धडक कारवाई ; वाळू सम्राटांचे धाबे दणाणले
5औंध, दि. 29 : मंगळवारी रात्री वडूज ते औंध रस्त्यावरील पळशी गावानजीकच्या फाट्यावर वडूजकडून कराडकडे तसेच वरूड ते औंधमार्गे कराडकडे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या सहा डंपरवर धडक कारवाई करून महसूल विभागाने डंपर व वाळूसह सुमारे तीस लाख रुपयांचा ऐवज जप्त केला.
महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अवैधरीत्या वाळू वाहतूक करणार्‍या वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. यापुढे ही धडक कारवाई सुरूच राहणार असल्याची माहिती औंधचे मंडलाधिकारी प्रताप राऊत यांनी दिली.
याबाबबतची माहिती अशी, गेल्या काही दिवसांपासून औंध परिसरातून कराड, सातारा, कडेगाव, सांगली भागात मोठ्या प्रमाणात अवैधरीत्या वाळू वाहतूक सुरू होती. यामध्ये महिन्यापूर्वी औंध येथील एका नागरिकाचा बेदरकारपणे डंपर चालविल्याने मृत्यू झाला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.  त्यामुळे औंध भागातून सुरू असलेली अवैध वाळू वाहतूक रोखण्याचे आव्हान महसूल विभागासमोर  होते. मंगळवारी रात्री आठ ते नऊच्या सुमारास प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार सुशील बेल्लेकर, नायब तहसीलदार सुधाकर धाईंजे, मंडलाधिकारी प्रताप राऊत, विजय पाटील, किशोर घनवट, शरद सानप, अभय शिंदे, अजित लोखंडे, धनंजय तडवळेकर यांच्या पथकाने पळशी फाटा व औंध-वरूड रस्त्यावर सापळा लावून वाळूने भरलेले एकूण सहा डंपर तसेच एक मोकळा   ट्रक असा सुमारे तीस लाखाचा ऐवज जप्त केला. अचानक
झालेल्या कारवाईमुळे वाळू सम्राटांचे धाबे दणाणले. सध्या सि.
कुरोली, औंध, चौकीचा आंबा तसेच गोपूज, पुसेसावळीमार्गे
ही अवैध वाळू वाहतूक राजरोसपणे सुरू होती. महसूल विभागाने
केलेल्या धडक कारवाईमुळे सर्वसामान्य जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. या अवैध वाहतुकीचे समूळ उच्चाटन करावे, अशी मागणी केली जात आहे.
दरम्यान, यामधील जप्त केलेले चार वाळू डंपर वडूज तहसील कार्यालय तर दोन डंपर औंध पोलीस स्टेशनमध्ये लावण्यात आले आहेत. बुधवारी उशिरापर्यंत जप्त केलेल्या डंपरचे पंचनामे न झाल्याने पुढे नेमकी काय कारवाई झाली हे समजू शकले नाही.
वाळू उपशाचा रात्रीस खेळ चाले
भुरकवडी, वाकेश्‍वर, अंबवडे, निमसोड व अन्य भागातून येरळा नदीपात्रातून अवैधरीत्या वाळू उपसा करून ही वाळू वाहतूक पहाटे व रात्री सुरू होती. त्यामुळे वाळू उपशाचा बेधडकपणे रात्रीस खेळ चाले अशी जोरदार चर्चा औंध परिसरात सुरू होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: