Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
फलटणच्या सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या आवारात बिबट्या सीसी टीव्ही कॅमेर्‍यात कैद
ऐक्य समूह
Thursday, November 30, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: re4
5फलटण,  दि. 29 : गेल्या दोन दिवसांपासून फलटण शहरात विविध ठिकाणी बिबट्या किंवा वाघ आढळल्याचे अनेकांनी सांगितल्यानंतर त्याबाबत असलेली संभ्रमावस्था मंगळवारी रात्री 1.30 वाजता सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या आवारात बिबट्या वावरताना सी.सी. टीव्ही कॅमेर्‍यात जेरबंद झाल्याने फलटण शहरात बिबट्याचा वावर निश्‍चित झाला आहे. वनखाते, पोलीस, नगरपालिका यांनी त्याच्या शोध मोहिमेला सुरुवात करण्याबरोबर नागरिकांनी सावधानता बाळगण्याचे आवाहन केले आहे.  
दि. 28 रोजी पहाटे 5.30 वाजता नवलबाई मंगल कार्यालय, मारवाड पेठ येथे शहराच्या मध्यवर्ती भागात तेथील एक व्यापारी परगावी निघाले असताना त्यांना बिबट्याचे दर्शन झाले. त्यानंतर वनखात्याचे अधिकारी व कर्मचार्‍यांनी संपूर्ण शहरासह परिसर पिंजून काढला. मात्र त्यांना कोठेही बिबट्या आढळला नाही. तथापि, विमानतळ परिसरात काहींनी बिबट्या पाहिल्याचे त्यांना सांगितले.
बुधवार, दि. 29 रोजी सकाळी बारस्कर चौकातील एका मंदिरात बिबट्याने दर्शन दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याची खातरजमा होवू शकली नाही. दरम्यान, शहरातील गजानन चौक येथे असलेल्या सिटी प्राईड (जुने नामवैभव) चित्रपटगृहाच्या इमारतीवरील सी.सी.टी.व्ही. कॅमेर्‍यात रात्री 1.30 वाजता बिबट्या चित्रपटगृहाच्या आवारात फिरताना व त्यानंतर  कुंपण भिंतीवरून उडी मारून बाहेर जाताना चित्रित झाल्यानंतर दोन दिवसांपासून बिबट्या फलटण शहरात असल्याचे स्पष्ट झाले आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती व नगरसेवक श्रीमंत रघुनाथराजे नाईक-निंबाळकर यांनी स्वत: सिटी प्राईड चित्रपटगृहाच्या सी. सी. टी.व्ही.मध्ये कैद झालेल्या बिबट्याचे चित्रीकरण पाहिल्यानंतर
तेथील रखवालदार, अन्य अधिकारी व कर्मचार्‍यांशी त्यांना
बिबट्याची चाहुल लागली किंवा नाही याबाबत चर्चा केला. त्या दरम्यान, बिबट्या घरावरून गेल्यामुळे काही घरांचे पत्रे वाजल्याचे तेथील नागरिकांनी सांगितले.
बिबट्या शहरात वावरत असल्याची खात्री झाल्यानंतर श्रीमंत रघुनाथराजे यांनी वनखात्याचे अधिकारी, पोलीस अधिकारी व नगराध्यक्षा सौ. नीता नेवसे, मिलिंद नेवसे, नगरपालिकेच्या अधिकार्‍यांशी चर्चा केली. याबाबत नागरिकांना जागृत करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत नगरपरिषद व वनखात्याच्या वाहनातून शहरात ध्वनिवर्धकाद्वारे याची माहिती देवून विशेषत: पहाटे फिरायला जाणारे नागरिक, विद्यार्थी व पालकांसह सर्वच नागरिकांनी सावधानता बाळगण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. वन खाते व पोलीस यंत्रणेद्वारे बिबट्याचा शोध घेतला जात आहे. नागरिकांनी कोणत्याही परिस्थितीत घाबरून जावू नये. मात्र, सावधानता बाळगावी. शक्यतो एकट्याने फिरू नये. हातात काठी ठेवावी. बिबट्या दिसल्याची खात्री केल्याशिवाय लोकांनी इतरांना काही सांगू नये. शहर परिसरात बिबट्या दिसला आहे ,हे खरे असले तरी अफवा पसरवू नयेत. लोकांनीही अफवांवर विश्‍वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
शहराप्रमाणेच शहरालगतच्या कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, फरांदवाडी, अलगुडेवाडी ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रातही ध्वनिवर्धकाद्वारे ग्रामस्थांना माहिती देवून सावधानता बाळगण्याबाबत आवाहन करण्याच्या सूचना श्रीमंत रघुनाथराजे यांनी केल्या आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: