Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘त्या’ नराधमांना फासावर लटकताना पहायचे आहे
ऐक्य समूह
Thursday, November 30, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: lo1
कोपर्डीच्या भगिनीला सातार्‍यात श्रद्धांजली
5सातारा, दि. 29 : संपूर्ण राज्याला हादरवणार्‍या कोपर्डी प्रकरणातील  तिन्ही आरोपींना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावल्यानंतर सातार्‍यात या निकालाचे जोरदार स्वागत करण्यात आले. पोवई नाका येथील ऐतिहासिक शिवतीर्थावर मराठा समाजाच्यावतीने ‘कँडल मार्च’ काढून कोपर्डीच्या भगिनीला श्रद्धांजली वाहण्यात आली. न्यायालयाच्या निकालामुळे कोपर्डीच्या ताईला आज खर्‍या अर्थाने न्याय मिळाला आहे. मात्र, त्या तीन नराधमांना फासावर लटकताना पहायचे आहे, अशा  प्रतिक्रिया  व्यक्त करत सातार्‍यातील मराठा समाजबांधवांनी पुढील लढाईसाठीही एकसंध राहण्याचा निर्धार केला.
कोपर्डीच्या भगिनीला श्रद्धांजली वाहण्यासाठी सातार्‍यातील पोवई नाक्यावर बुधवारी सायंकाळी कँडल मार्च काढण्यात आला. प्रारंभी मराठा भगिनींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. शरद काटकर म्हणाले, कोपर्डीच्या नराधमांना फाशी मिळावी, अशी सर्वसामान्यांची इच्छा होती. न्यायदेवतेने जनभावना ओळखून त्या नराधमांना फाशीची शिक्षा ठोठावली आहे. हा मराठा समाजाच्या एकजुटीचा विजय आहे; परंतु  मराठा बांधवांना आरक्षण मिळावे, ही प्रमुख मागणी आहे. त्यासाठी लढा सुरूच राहणार आहे.
हरिष पाटणे म्हणाले, कोपर्डीच्या भगिनीला न्याय मिळावा यासाठी मराठा बांधवांनी राज्यभरात 58 मोर्चे काढले. आपल्या भगिनीसाठी  मराठा बांधव रस्त्यावर उतरले. न्यायदेवतनेही जनभावनांचा आदर करून कोपर्डीच्या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावली. मात्र, महाराष्ट्राच्या जनतेला या तिन्ही नराधमांना लवकरात लवकर फासावर लटकताना पहायचे आहे. येथून पुढेही आपली लढाई सुरूच राहणार असून मराठा बांधवांनी असेच एकसंध राहावे. यावेळी ‘एक मराठा, लाख मराठा’, ‘तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘मराठा एकजुटीचा विजय असो’ अशा घोषणांनी पोवई नाका परिसर दणाणून गेला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: