Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बंगल्यात चोरीसाठी गेलेल्या चोरट्याचा हृदयविकाराने मृत्यू, साथीदार पसार
ऐक्य समूह
Wednesday, November 29, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: re2
गजानन हौसिंग सोसायटीमधील घटना
5कराड, दि. 28 : बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराचा झटका येवून मृत्यू झाला. या घटनेनंतर त्याचे साथीदार त्याला तेथेच सोडून पसार झाल्याची घटना कराडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की कराडनजीक गजानन हौसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी हे पॉलिश पेपरचे पश्‍चिम महाराष्ट्रातील मुख्य वितरक आहेत. बंगल्यातच त्यांनी पायस एंटरप्रायजेस नावाचे गोडाऊन व त्यांचे कार्यालय सुरू केले आहे. या बंगल्यात कोणीही वास्तव्यास नसते. मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास जोशी नेहमीप्रमाणे बंगल्यात आले असता पोर्चमध्ये कोणीतरी पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधित व्यक्ती मृतावस्थेत पडल्याचे दिसले. त्यामुळे जोशी यांनी याबाबतची माहिती कराड शहर पोलिसात दिली. माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक नवनाथ ढवळे, कराड शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रमोद जाधव यांनी कर्मचार्‍यांसह घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता जोशी यांच्या बंगल्याचा मुख्य दरवाजा कटावणीने उचटकल्याचे दिसून आले. तसेच पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजाही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत होते.
बंगल्याच्या पोर्चमध्ये मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकार्‍यांनी व्यक्त केली आहे. तसेच संबंधित व्यक्ती चोर असावी, असा पोलिसांचा कयास आहे. संबंधिताच्या खिशात कराडमधील एका थिएटरचे रात्रीच्या शोचे तिकीट आढळले. त्यावर तीन व्यक्तींसाठी असा उल्लेख आहे. त्यामुळे या चोरट्यासोबत अन्य दोघे असावेत, अशी शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. घटनेची नोंद कराड शहर पोलीस ठाण्यात झाली आहे. घटनास्थळी श्‍वान तसेच ठसे तज्ञांना पाचारण करण्यात आले होते. श्‍वानाने बंगल्यापासून काही अंतरापर्यंत माग काढला. मात्र पुढे श्‍वान घुटमळले. ठसे तज्ञांच्या पथकाने दरवाजासह इतर ठिकाणचे ठसे घेतले असून हे ठसे सराईत चोरट्यांच्या टोळीचे आहेत का? याची खातरजमा केली जात आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: