Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
दहशतवाद्यांच्या यादीतून नाव हटवा
ऐक्य समूह
Wednesday, November 29, 2017 AT 11:38 AM (IST)
Tags: na3
हाफिज सईदची संयुक्त राष्ट्रांकडे याचना
5नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जमात-उद-दावा’ या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईदने आता संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली आहे. संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने बंदी घातलेल्या दहशतवाद्यांच्या यादीतून आपले नाव हटविण्यात यावे, अशी याचिका त्याने केली आहे. हाफिज सईदची गेल्याच आठवड्यात पाकिस्तानच्या न्यायिक पुनर्विलोकन मंडळाने नजरकैदेतून सुटका केली आहे. त्यानंतर हाफिज सईद स्वत:ची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. नोव्हेंबर 2008 मधील मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रे सुरक्षा परिषदेने ‘जमात-उद-दावा’चा  म्होरक्या हाफिज सईदला डिसेंबर 2008 मध्ये जागतिक दहशतवादी घोषित केले होते. मात्र, अमेरिकेने 26/11 च्या हल्ल्यापूर्वीच मे 2008 मध्ये हाफिजला दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मुंबईवरील 26/11 च्या हल्ल्यानंतर अमेरिकेने हाफिजवर 1 कोटी डॉलरचे इनामही ठेवले आहे. या हल्ल्यात 166 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामध्ये 6 अमेरिकन नागरिकांचा समावेश होता. मुंबईवर दहशतवादी हल्ला करणारी ‘लष्कर-ए-तोयबा’ ही संघटना ‘जमात-उद-दावा’ची दहशतवादी आघाडी असल्याचे मानले जाते. 
पाकिस्तानच्या न्यायिक पुनर्विलोकन मंडळाने गेल्याच आठवड्यात हाफिज सईदची नजरकैदेतून सुटका केली आहे. हाफिज 297 दिवस नजरकैदेत होता. त्याच्याविरोधात सबळ पुरावे नसल्याचे कारण न्यायिक मंडळाने दिले होते. सुटका झाल्यानंतर हाफिजने लगेचच भारताविरुद्ध गरळ ओकली होती. काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढा सुरू ठेवणार असून त्यासाठी संपूर्ण पाकिस्तानमधून लोकांना एकत्र करणार असल्याची दर्पोक्ती
त्याने केली होती.
हाफिज सईदच्या सुटकेची बातमी येताच भारताने पाकिस्तानवर कडक टीका केली होती. दहशतवाद्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया भारताने व्यक्त केली होती. हाफिजच्या सुटकेवर जगभरातूनही टीका झाली होती. हाफिजच्या सुटकेचा अमेरिकेने तीव्र शब्दांमध्ये निषेध केला होता. हाफिज सईदला अटक करून त्याला त्याच्या गुन्ह्यांबद्दल आरोपी करावे, असे अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने पाकिस्तानला सुनावले होते. अमेरिकेने ‘लष्कर-ए-तोयबा’ या विदेशी दहशतवादी संघटनेवर यापूर्वीच बंदी घातली आहे. दहशतवादी हल्ल्यांमध्ये शेकडो लोकांच्या प्राणहानीला ही संघटना कारणीभूत असून त्यात अमेरिकी नागरिकांचाही समावेश आहे. पाकिस्तान सरकारने हाफिजला पकडून त्याच्या गुन्ह्यांबद्दल आरोपी करण्याची बाब गांभीर्याने घ्यावी, असे निवेदन अमेरिकेच्या गृह मंत्रालयाने जारी केले आहे. हाफिज सईद आणि त्याचे चार साथीदार अब्दुल्ला उबैद, मलिक जफर इक्बाल, अब्दुल रहमान आबिद आणि काजी काशीफ हुसेन यांना पंजाब प्रांताच्या गृह विभागाने दहशतवादविरोधी कायदा 1997 च्या अंतर्गत 31 जानेवारीपासून नदरकैदेत ठेवले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: