Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वरचे घोटीलमध्ये शॉर्टसर्किटमुळे दहा खणी तिघई घर जळून खाक
ऐक्य समूह
Wednesday, November 29, 2017 AT 11:42 AM (IST)
Tags: re5
20 लाख 70 हजार रुपयांचे नुकसान; 6 कुुटुंबांचा संसार उघड्यावर
5ढेबेवाडी, दि. 28 : वरचे घोटील, ता. पाटण येथे सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीमध्ये दहा खण तिघईचे संपूर्ण घर जळून खाक झाले असून केवळ भिंतीचा सांगाडा शिल्लक राहिला आहे. या आगीत पवार यांच्या सहा कुटुंबातील सोने, रोख रक्कम, धान्य, संसारोपयोगी साहित्य, फर्निचरसह सर्वकाही जळून खाक झाले असून आगीत म्हैस, रेडकू, खोंड आदी जनावरे होरपळून मृत पावली आहेत. आगीत पवार कुटुंबाचे एकूण 20 लाख 70 हजार रुपयांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले आहे. तर 6 कुटुंबातील सर्वांचे मिळून 31 तोळे सोने व 5 लाख 20 हजार रोख रक्कमही जळून खाक झाल्याने या कुटुंबांना मोठा धक्का बसला आहे. आगीमुळे पवार कुटुंबीयांना अंगावरील कपड्यावर बाहेर पडावे लागल्याने त्यांचा संसार उघड्यावर पडला आहे. दरम्यान, या घटनेचा पंचनामा गावकामगार तलाठी यांनी केला आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, ढेबेवाडी विभागातील दुर्गम व डोंगराळ ठिकाणी वसलेल्या वरचे घोटील येथे सोमवार दि. 27 रोजी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास दहा खण तिघईच्या मोठ्या  घरास शॉर्टसर्किटने अचानक आग लागली. यावेळी आगीने रौद्ररुप धारण केल्याने व धुरामुळे घरातील लोकांना जाग आली. लाईटच्या मीटर जवळच आगीने पेट घेतला असल्याचे त्यांच्या लक्षात आले. यावेळी घरातील सुमारे 20 ते 25 लोक आपला जीव वाचविण्यासाठी तत्काळ घराबाहेर पडले. जवळच असणार्‍या माळ्यावर जनावरांसाठी चारा साठवून ठेवला असल्याने त्या चार्‍याने पेट घेतल्याने आगीने रौद्ररुप धारण केले होते. आग जनावरांच्या गोट्याकडे जात असल्याचे लक्षात येताच दावणीला बांधलेली सुमारे 10 ते 15 जनावरांचे कासरे कापून जनावरांना मोकळे सोडण्यात आले. यापैकी तीन जनावरे आगीच्या दिशेने घरात गेल्याने त्यांना बाहेर येता आले नाही त्यामुळे ती आगीच्या भक्ष्यस्थानी पडली.
घराला आग लागल्याचे लक्षात येताच आग विझवण्यासाठी गावातील सुमारे 70 कुटुंबातील सर्व अबाल-वृध्दांनी शर्थीचे प्रयत्न केले. घरातील पाण्याची भांडी घेवून आग विझवण्यासाठी नागरिकांनी धाव घेतली.
याशिवाय बोअरचे पाणी सुरू करून आग आटोक्यात आणण्यासाठी लोकांनी प्रयत्न केले. संपूर्ण घराला आगीने वेडा दिल्याने आग आटोक्यात आणणे अशक्य बनले होते. या आगीत घरातील सोने, रोख रक्कम, धान्य, संसारोपयोगी साहित्य, कपडे, जनावरांसाठी साठवून ठेवलेला चारा, शेतीची अवजारे या सर्व वस्तू जळून खाक झाल्या आहेत. तर आगीमुळे
घरातील काहीही शिल्लक राहिले नसल्याने पवार कुटुंबीयांचे संसार उघड्यावर पडले आहेत.
या आगीचा पंचनामा मंडलाधिकारी प्रवीण शिंदे, गावकामगार तलाठी अमोल चव्हाण, कोतवाल रमेश पुजारी, सोमनाथ पाटील यांनी केला आहे. यात अंकुश राजाराम पवार यांचे जनावरांचे शेड जळून 45 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. तानाजी महादेव पवार यांचे 4 तोळे सोने, 40 हजार रुपये रोख रक्कम व इतर साहित्य मिळून 2 लाख 95 हजार रुपयांचे, मारूती महादेव पवार यांचे 11 तोळे सोने, 1 लाख 50 हजार रुपये रोख रक्कम व इतर साहित्य, एक म्हैस, एक रेडकू असे मिळून 7 लाख 90 हजार रुपयांचे नुकसान, श्रीरंग महादेव पवार यांचे 4 तोळे सोने, रोख रक्कम 10 हजार रुपये व इतर साहित्य मिळून 2 लाख 50 हजार नुकसान, महादेव सादू पवार यांचे 4 तोळे सोने, 5 हजार रोख रक्कम व इतर साहित्य मिळून 2 लाख 40 हजार नुकसान, राजाराम महादेव पवार यांचे 8 तोळे सोने, 80 हजार रोख रक्कम, एक वासरू व इतर साहित्य मिळून 4 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. दरम्यान, घराला आग लागल्याचे समजताच ढेबेवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अशोकराव पाटील यांनी तात्काळ घटनास्थळी जावून पाहणी केली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: