Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मंत्री, नेत्यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले
ऐक्य समूह
Wednesday, November 29, 2017 AT 11:36 AM (IST)
Tags: na2
‘पद्मावती’बाबत सेन्सॉरच्या निर्णयापर्यंत शांत रहा
5नवी दिल्ली, दि. 28 (वृत्तसंस्था) : ’पद्मावती’ चित्रपटाबद्दल वेगवेगळी वक्तव्ये करून वादाला फोडणी देणार्‍या विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना व देशभरातील मंत्र्यांना सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी चंगलेच फटाकरले. या चित्रपटाबाबत सेन्सॉर बोर्ड अंतिम निर्णय घेत नाही, तोपर्यंत त्याबद्दल कुठलेही मत व्यक्त करू नका. त्यामुळे वातावरण बिघडू शकते आणि सेन्सॉर बोर्डाच्या निर्णयावर परिणाम होऊ शकतो, असे न्यायालयाने सुनावले.
’पद्मावती’चे निर्माते व दिग्दर्शकांविरोधात फौजदारी खटला चालवण्यात यावा, अशी मागणी करणारी जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर व न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. असल्या निरर्थक याचिका दाखल  करत जाऊ नका, असे खंडपीठाने याचिकाकर्त्याला सुनावले. त्याच वेळी चिथावणीखोर वक्तव्ये करून ‘पद्मावती’च्या वादात तेल ओतणार्‍या राजकारण्यांनाही न्यायालयाने झापले. जबाबदार पदांवर असलेल्या व्यक्तींनी कायद्याचा आदर राखायला हवा. सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटासंदर्भात कोणताही निर्णय घेतला नसताना जाहीर मते मांडणे अयोग्य आहे. अनावश्यक वक्तव्यांमुळे वातावरण बिघडू शकते. या वातावरणामुळे सेन्सॉर बोर्डाच्या प्रतिनिधींची मने पूर्वग्रहदूषित होऊन त्याचा परिणाम निर्णयावर होऊ शकतो, असे न्यायालयाने स्पष्ट केले.दरम्यान, सेन्सॉर बोर्डाचा निर्णय होईपर्यंत या चित्रपटाचे प्रदर्शन भारताबाहेर करण्यात येणार नसल्याची हमी दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी न्यायालयाला दिली. हा चित्रपट इतर देशांमध्ये 1 डिसेंबर रोजी प्रदर्शित करण्यात येणार असल्याच्या अफवा असल्याचेही त्यांनी न्यायालयाला सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: