Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कर्जमाफीच्या घोळामुळे गौतम यांची उचलबांगडी
ऐक्य समूह
Wednesday, November 29, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: mn2
दहा वरिष्ठ सनदी अधिकार्‍यांच्या बदल्या
5मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) : राज्य सरकारने आज दहा वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या केल्या. कर्जमाफीसाठी पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करताना झालेल्या गोंधळानंतर रजेवर गेलेले माहिती व तंत्रज्ञान विभागाचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांची वित्त विभागात बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विपिन इटनकार यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून तर एस. जी. कोलते यांची उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
शेतकर्‍यांचे कर्ज माफ करण्याची घोषणा करण्यात आल्यानंतर शेतकर्‍यांकडून ऑनलाइन अर्ज भरून घेण्यात आले. त्याची पडताळणी करून पात्र शेतकर्‍यांची यादी तयार करण्याचे काम माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या देखरेखीखाली सुरू होते; परंतु ही यादी तयार करताना प्रचंड गोंधळ झाल्यामुळे कर्जमाफीची प्रक्रिया रखडली असून सरकारला मोठ्या टीकेला व शेतकर्‍यांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे या खात्याचे प्रधान सचिव व्ही. के. गौतम यांना रजेवर पाठवण्यात आल्याची चर्चा होती. रजेवर असतानाच अखेर आज त्यांची बदली करण्यात आली. वित्त विभागात लेखा व कोषागार विभागाच्या प्रधान सचिवपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.   
माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या प्रधान सचिवपदाचा कार्यभार आता एस. व्ही. आर. श्रीनिवास यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.
गौतम यांची नियुक्ती लेखा व कोषागार विभागाच्या प्रधान सचिवपदावर करताना या पदावरील श्रीमती वंदना कृष्णा यांची अतिरिक्त मुख्य सचिव (वित्तीय सुधारणा) या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. या पदावरील आर. ए. राजीव यांची वित्त विभागातच प्रधान सचिव (व्यय) या पदावर बदली करण्यात आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डी. बी. देसाई यांची मंत्रालयात आपत्ती निवारण कक्षाचे संचालक म्हणून बदली करण्यात आली असून लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. एस. गुरसाळे यांची नागपूर येथे मनरेगाचे आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्य सचिव कार्यालयातील सहसचिव एस. डी. मांढरे यांची पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करताना त्यांच्या जागी आर. डी. निवतकर यांची बदली
करण्यात आली आहे. मनरेगाचे आयुक्त एस. जी. कोलते यांची
उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. गडचिरोलीचे अप्पर जिल्हाधिकारी विपिन इटनकर
यांची लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: