Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हिवाळी अधिवेशन दोनच आठवड्यांचे
ऐक्य समूह
Wednesday, November 29, 2017 AT 11:39 AM (IST)
Tags: mn4
कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी
5मुंबई, दि. 28 (प्रतिनिधी) :राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 11 डिसेंबरला सुरू होत असून यंदाही हे अधिवेशन दोनच आठवडे होणार आहे. कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज 22 डिसेंबरपर्यंतचा कार्यक्रम निश्‍चित करण्यात आले. विरोधी पक्षनेत्यांनी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी केली असून नियोजित कामकाज पूर्ण न झाल्यास 20 डिसेंबर रोजी पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेऊन अधिवेशन वाढविण्याबाबत विचार केला जाईल, असे आश्‍वासन संसदीय कामकाज मंत्री गिरीश बापट यांनी दिले आहे.
नागपूर हिवाळी अधिवेशनाचा कार्यक्रम निश्‍चित करण्यासाठी मंगळवारी विधानभवनात विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक ्रझाली. विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे, विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील व धनंजय मुंडे, शिवसेनेचे गटनेते या बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत हिवाळी अधिवेशनाच्या कामकाजाची रूपरेषा ठरविण्यात आली. या बैठकीनंतर संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.       
11 ते 22 डिसेंबर असे 11 दिवस अधिवेशनाचे कामकाज होणार आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असला तरी सरकार सर्व प्रकारच्या चर्चेला तयार आहे. चर्चेसाठी वेळ कमी पडला तरी सभागृहाचे कामकाज रात्री उशिरापर्यंत सुरू ठेवले जाईल, असे बापट यांनी स्पष्ट केले. नागपूर अधिवेशनात सरकार 13 विधेयके व 11 अध्यादेश मांडण्यात येणार आहेत. विधानपरिषदेत 5 विधेयके प्रलंबित असून ती मंजूर करून घेण्याचा प्रयत्न असल्याचे बापट यांनी सांगितले.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात केवळ दहा दिवस कामकाज होणार असून विदर्भासारख्या मागास भागात होणारे अधिवेशन किमान चार आठवडे चालले पाहिजे, असा आग्रह धरताना अधिवेशन वाढवण्याची मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे. प्रादेशिक असमतोलासंबंधीच्या केळकर अहवालावर 2014 च्या हिवाळी अधिवेशनात चर्चा झाली असली तरी मूळ अहवालावरील कृती अहवालासंदर्भात सभागृहात चर्चा होणे आवश्यक आहे. राज्याच्या मागास भागाच्या समतोल विकासासाठी ते गरजेचे आहे. विदर्भ आणि राज्यातील अनेक गंभीर प्रश्‍न असल्याचे मुंडे यांनी सांगितले.
20 डिसेंबरला निर्णय घेऊ : बापट
आजच्या बैठकीत अधिवेशनाचा कालावधी वाढविण्याची मागणी विरोधी पक्षांनी केली होती. त्यानुसार 20 डिसेंबरला पुन्हा कामकाज सल्लागार समितीची बैठक घेतली जाईल. त्यामध्ये अधिवेशनाचा कालावधी वाढवण्यावर विचार करून निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट यांनी दिले. विरोधात असताना आपणही अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याची मागणी करत होता, याकडे लक्ष वेधले असता बापट म्हणाले, त्यावेळी जनतेचे प्रश्‍न मांडून आम्ही सभागृहाचे कामकाज करत होतो. गोंधळ करून कामकाज बंद पाडत नव्हतो. दुर्दैवाने आता तसे होत नाही. राज्य सरकार सर्व मुद्द्यांवर चर्चेला तयार असल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: