Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रामजन्मभूमीवर फक्त मंदिराची उभारणी : मोहन भागवत
ऐक्य समूह
Saturday, November 25, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: mn4
5उडुपी, दि. 24 (वृत्तसंस्था) : अयोध्येतील वादग्रस्त रामजन्मभूमीच्या जागेवर फक्त राम मंदिरच उभारले जाईल, असे ठाम प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी शुक्रवारी केले. राम मंदिरावर लवकरच भगवा ध्वज फडकताना दिसेल. हा दिवस आता दूर नाही. त्या जागेवर मंदिराशिवाय अन्य काहीही उभारले जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कर्नाटकमधील उडुपीमध्ये विश्‍व हिंदू परिषदेच्यावतीने सुरू असलेल्या धर्मसंसदेत ते बोलत होते. या धर्मसंसदेस दोन हजार हिंदू साधू, मठाधिपती आणि विश्‍व हिंदू परिषदेचे नेते सहभागी झाले आहेत. अयोध्येतील राम मंदिराबद्दल सर्वोच्च न्यायालयात 5 डिसेंबरला अंतिम सुनावणी होणार आहे. त्यामुळे भागवत यांचे वक्तव्य महत्त्वपूर्ण मानले जात आहे. 
रामजन्मभूमीच्या जागेवर केवळ राम मंदिर उभारले जाईल. त्या ठिकाणी दुसरी कोणतीही वास्तू उभारली जाणार नाही. अयोध्येत लवकरच राम मंदिराची उभारणी केली जाईल. तेथे आणलेल्या शिळांच्या मदतीने राम मंदिर उभारले जाईल. हा निर्णय लोकप्रियतेसाठी घेतलेला नसून तो आमच्या श्रद्धेचा भाग आहे. गेल्या अनेक वर्षांचा त्याग आणि प्रयत्नांमुळे राम मंदिराची उभारणी करणे आता शक्य आहे, असे सांगताना हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचेही भागवत म्हणाले. या जागेवर पूर्वी असलेल्या राम मंदिराप्रमाणेच भव्य मंदिर उभारले जाईल. गेली 25 वर्षे रामजन्मभूमी चळवळीत अग्रभागी असलेल्यांच्या मतांचा विचार केला जाईल. पूर्वीप्रमाणेच हे बांधकाम त्याच दगडांमध्ये करण्यात येईल. मंदिर उभारणीपूर्वी जनजागृती आवश्यक आहे, असे ते म्हणाले. भागवत यांनी गोरक्षकांच्या मुद्द्यावरही भाष्य केले. लोकांकडून आमच्या गोरक्षकांना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गायीचे रक्षण ही आमची संस्कृती आहे. जोपर्यंत गोहत्येवर बंदी आणली जात नाही, तोपर्यंत आम्ही शांतपणे जगू शकत नाही, असे ते म्हणाले. ही धर्मसंसद तीन दिवस सुरू राहणार असून यामध्ये राम मंदिर आणि हिंदू धर्माशी संबंधित विषयांवर चर्चा होणार आहे. धर्मसंसदेत ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री. श्री. रविशंकर आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हेदेखील सहभागी होण्याची शक्यता आहे. जन्मभूमीचा वाद संपुष्टात आणण्यासाठी श्री. श्री. रविशंकर प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या प्रयत्नांना शिया वक्फ बोर्डानेदेखील सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. शिया वक्फ बोर्डाने राम मंदिर आणि बाबरी मशिदीचा वाद सोडवण्यासाठी एक प्रस्ताव दिला आहे. अयोध्येत राम मंदिर तर लखनौमध्ये बाबरी मशीद उभारली जावी, असे शिया वक्फ बोर्डाने प्रस्तावात नमूद केले आहे. लखनौमध्ये उभारण्यात येणार्‍या मशिदीला कोणत्याही मुस्लीम शासकाचे नाव न देता ‘मस्जिद-ए-अमन’ म्हटले जावे, असेही बोर्डाने सुचवले आहे. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिमांमध्ये अनेक वर्षांपासून सुरू असलेला वाद संपुष्टात येईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: