Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चीन सीमेलगत रस्तेबांधणीला वेग
ऐक्य समूह
Saturday, November 25, 2017 AT 11:10 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 24 (वृत्तसंस्था) : डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर भारतीय लष्कराने भारत-चीन सीमेलगत मोठ्या प्रमाणावर रस्त्यांचे जाळे उभारण्यासाठी वेगाने काम करण्याचा निर्णय घेतला आहे. सीमा भागात सैन्याला वेगाने हालचाली करता येण्यासाठी लष्कराच्या अभियांत्रिकी विभागाकडे (कोअर ऑफ इंजिनिअर्स) ही जबाबदारी सोपवली आहे. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या विभागाने अत्याधुनिक यंत्रसामग्रीच्या खरेदीची प्रक्रिया गतिमान केली आहे.
लष्कराचा अभियांत्रिकी विभाग (सीओई) 237 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आला. जवानांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे आणि सीमा भागात त्यांच्या वेगवान हालचालींसाठी दळणवळण निर्माण करणे, हे या विभागाचे काम आहे. या विभागाची भूसुरूंग शोधण्याची क्षमता वाढवण्यासाठी एक हजार भूसुरुंगशोधक यंत्रांची मागणी नोंदवली आहे. डोंगर फोडणारी आणि रस्ते बांधणीसाठी आवश्यक असणारी अवजड यंत्रे, जवानांची ने-आण करण्यासाठी ट्रक आणि इतर यंत्रसामग्रीच्या खरेदीची प्रक्रिया गतिमान केली आहे. ही वाहने आणि अवजड यंत्रे लवकरच मिळतील. पर्वतीय भागात वेगाने हालचाल करण्यायोग्य रस्ते बांधण्यासाठी दगड फोडणारी जवळपास शंभर अत्याधुनिक यंत्रांच्या खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. अल्पकाळ वापरासाठी आवश्यक असलेले 50 पूलही मागविण्यात आले आहेत.
लष्कराच्या योजनेनुसार, अभियांत्रिकी विभागातील अभियंत्यांवर सर्वप्रथम पर्वतीय प्रदेशातील पठारी प्रदेशात रस्तेबांधणीची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. त्यानंतर आवश्यकता भासल्यास सीमा रस्तेबांधणी संघटनेकडून (बीआरओ) हे रस्ते आणखी मजबूत केले जातील. 2005 मध्ये भारत-चीन सीमेवरील व्यूहात्मकदृष्ट्या महत्त्वाच्या भागांमध्ये 73 रस्ते बांधण्याचे आदेश ‘बीआरओ’ला देण्यात आले होते. मात्र, या कामाला प्रचंड विलंब झाल्याने लष्कराने नाराजी व्यक्त केली होती. संवेदनशील सीमा भागात पायाभूत सुविधांची उभारणी हा केंद्र सरकारच्या धोरणाचा भाग असून या सुविधांमुळे सैन्यदलांच्या वेगवान हालचालींना मदत होईल. 
अभियांत्रिकी विभागातील पहिली कंपनी 1780 साली स्थापन करण्यात आली. हा विभाग 18 नोव्हेंबर रोजी आपला स्थापनादिन साजरा करतो. डोकलाम वादाच्या पार्श्‍वभूमीवर चीन सीमेवरील पायाभूत सुविधांच्या मजबुतीवर लष्कराने भर दिला आहे. डोकलाममधील वादानंतर लष्करप्रमुख बिपिन रावत यांनी चीनच्या लष्करी धोरणावर जोरदार टीका केली होती. चीनच्या विस्तारवादी धोरणामुळे लहानसहान वादांचे मोठ्या युद्धात रूपांतर होऊ शकते, असा इशारा त्यांनी दिला होता. भारत-भूतान-चीन यांच्यातील तिहेरी सीमेवरील वादग्रस्त डोकलाम भागात चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने सुरू केलेल्या रस्तेबांधणीला भारतीय जवानांनी विरोध केला होता. त्यामुळे 16 जूनपासून दोन्ही बाजूंचे सैनिक एकमेकांसमोर उभे ठाकले होते. हा संघर्ष 28 ऑगस्ट रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून भारतीय लष्कराने चीन सीमेलगत रस्तेबांधणीला वेग दिला आहे. त्याचबरोबर लष्कराने तोफखाना विभागाचे आधुनिकीकरण करण्याचा निर्णय घेतला असून हलक्या मशीनगन्स, कार्बाइन्स, रायफल्स यांची खरेदी सुरू केली आहे. त्यासाठी तब्बल 40 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: