Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कुलभूषण यांची आई, पत्नीच्या सुरक्षेची हमी द्या
ऐक्य समूह
Friday, November 24, 2017 AT 11:13 AM (IST)
Tags: na3
भारताची पाकिस्तानकडे मागणी
5नवी दिल्ली, दि. 23 (वृत्तसंस्था) : हेरगिरीच्या कथित आरोपांखाली पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा ठोठावलेले भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांची आई आणि पत्नीच्या सुरक्षेची हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे. कुलभूषण जाधव यांच्या भेटीसाठी त्यांची आई व पत्नी लवकरच पाकिस्तानला जाण्याची शक्यता आहे. या पार्श्‍वभूमीवर कुलभूषण यांची आई व पत्नी पाकिस्तानमध्ये असताना त्यांना कोणताही त्रास दिला जाणार नाही किंवा त्यांची कोणतीही चौकशी केली जाणार नाही, अशी हमी देण्याची मागणी भारताने पाकिस्तानकडे केली आहे.
कुलभूषण जाधव यांची आई व पत्नी पाकिस्तानमध्ये गेल्यावर  त्यांना सुरक्षा पुरवली जाईल, अशी हमी पाकिस्तानकडे मागण्यात आली आहे. पाकिस्तानमध्ये असताना त्यांची कोणतीही चौकशी केली जाऊ नये. त्यांना त्रास दिला जाऊ नये. तेथील तपास यंत्रणांनी त्यांना कोणतेही प्रश्‍न विचारू नयेत, अशी हमी देण्याची मागणीही करण्यात आली आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीशकुमार यांनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. कुलभूषण जाधव यांची त्यांच्या पत्नीशी भेट घडवून आणण्याचा प्रस्ताव शेजारी देशाने दिला असून त्याबद्दल भारत सकारात्मक आहे. जाधव यांच्या आईलाही मुलाची भेट घ्यायची आहे. त्यांची याबद्दलची विनंती अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. जाधव यांच्या पत्नीबरोबर त्यांची आईदेखील पाकिस्तानमध्ये जाऊ इच्छिते, असेही ते म्हणाले. कुलभूषण यांची आई आणि पत्नी पाकिस्तानात असताना भारताचा एक राजनैतिक अधिकारी कायम त्यांच्यासोबत ठेवण्याची परवानगीही भारताने मागितली आहे, असे रवीशकुमार यांनी सांगितले. जाधव यांच्या आईने पाकिस्तानी व्हिसासाठी अर्ज केला होता. त्याची दखल परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी जुलै महिन्यात घेतली होती. नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला कुलभूषण यांना त्यांच्या पत्नीला भेटण्याबद्दल पाकिस्तानने सकारात्मक भूमिका घेतली. या भेटीला ‘मानवतावादी’ दृष्टिकोनातून परवानगी दिली जाईल, असे पाकिस्तानने म्हटले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: