Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
अवैध व्यवसायाला जबाबदार बोरगावचा हवालदार निलंबित
ऐक्य समूह
Friday, November 24, 2017 AT 11:11 AM (IST)
Tags: lo3
5सातारा, दि. 23  : अतित, ता. सातारा येथे मटका व जुगार धंदा सुरु राहिल्या प्रकरणी जबाबदार धरत जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी बोरगाव पोलीस ठाण्याचे हवालदार अशोक कृष्णा मदने यांना निलंबित केले आहे. अवैध व्यवसायाच्या विरोधात कारवाई करण्यात कर्तव्यात कसूर करणार्‍या पोलीस कर्मचार्‍यांवर कारवाईचा आसूड ओढण्याचे महत्त्वपूर्ण काम पाटील यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी गेल्या आठवड्यात ज्या पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुगार, मटका व बेकायदा धंदे सुरु असतील त्या ठिकाणच्या पोलीस अधिकारी व कर्मचार्‍यांना निलंबित करण्याचा इशारा दिला आहे. बोरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन दिवसांपूर्वी विशेष पोलीस महानिरीक्षक परिक्षेत्र कोल्हापूरच्या पोलिसांनी अतित येथे छापा टाकून मुद्देमाल जप्त केला.
कोल्हापूर पोलिसांच्या पथकाने अतितमध्ये छापा टाकल्याने सातारा पोलीस दलाच्या कामकाजाविषयी चुकीचा संदेश गेला. त्यामुळे  पोलीस अधीक्षकांनी कठोर कारवाईचा निर्णय घेवून गुरुवारी त्या बिटमध्ये कार्यरत असणार्‍या पोलीस हवालदार अशोक मदने यांना निलंबित केले.
 यापुढेही ज्या बिटामध्ये अवैध धंदे सुरु असतील त्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यानंतर संबंधित पोलिसांना निलंबित करणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिला आहे. अशाप्रकारे गेल्या आठ दिवसात तीन जणांवर पोलीस अधीक्षकांनी कारवाई केल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: