Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
आदर्की परिसराला मुसळधार पावसाने झोडपले
ऐक्य समूह
Thursday, November 23, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: re2
5आदर्की बुद्रुक, दि. 22 :आदर्की व परिसराला बुधवारी सायंकाळी 5 च्या सुमारास मुसळधार पावसाने अक्षरश: झोडपून काढले. एक तासभर झालेल्या या  अवकाळी पावसात सर्वत्र पाणीच पाणी करून टाकले असतानाच परिसरातील डोंगररांगातून मोठ्या प्रमाणावर पाण्याचे धबधबे कोसळताना दिसत होते.
महिना, दीड महिन्यापूर्वी झालेल्या पावसानंतर या भागातील शेतकरी सुखावला. त्याने वापशानंतर आपल्या क्षेत्रात ज्वारी, गहू, हरभरा ही पिके केली. ती आज समाधानकारक स्थितीत असतानाच शेतातील आगाप ज्वारी व चारा पिकांना त्याचबरोबर या भागातील द्राक्ष व टोमॅटोच्या क्षेत्राला हा पाऊस आणि पावसाळी वातावरण नुकसान पोहोचविणारा ठरणार आहे. दरम्यान, या प्रचंड पावसाने या भागातील ओढे, नाले दुथडी भरून वाहिलेच परंतु रस्त्यावरही ओढ्या, नाल्यांप्रमाणे प्रचंड पाणी वहात होते. ढगफुटीप्रमाणे पडणारा पाऊस आणि सोसाट्याचा वारा यामुळे सुमारे तासभर या भागात भीतिदायक चित्र निर्माण झाले होते. 
पावसामुळे फलटण-सातारा मार्गावरील वाहतूक सुमारे तासभर धिम्या गतीने सुरू होती. त्यातच रस्त्यावर आलेल्या प्रचंड पाण्यामुळे रस्त्यावरील खड्डे किंवा पाण्याबरोबर वाहून आलेल्या दगडांचा वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अनेक वाहनचालक प्रचंड दबावाखाली वाहने चालवित असल्याचे दिसून आले.
पावसामुळे वाहन चालकांची तारांबळ
प्रचंड पाऊस आणि वादळ वार्‍यांमुळे रस्त्यावरील मार्गदर्शक फलक तुटल्यामुळे वाहन चालकांना प्रचंड पावसात रस्ता शोधताना अडचणी येत होत्या. त्यातच रस्त्यावर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या व दगड गोटे पडल्याने वाहन चालविताना जिकिरीचा सामना करावा लागत होता.  मार्गदर्शक फलक तातडीने दुरुस्त करून उभे करण्याची आवश्यकता आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: