Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शिवानी व शिवराज कदम या बहीण-भावाच्या मृत्यूबाबत तर्कवितर्क
ऐक्य समूह
Thursday, November 23, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: re4
5फलटण, दि. 22 :   वाठार निंबाळकर, ता. फलटण येथील शिवानी संतोष कदम (वय 11 महिने)  व शिवराज संतोष कदम (वय 4 वर्षे) या दोघा भाऊ- बहिणींचा उपचार सुरू असताना दुर्दैवी मृत्यू झाला तर त्यांचे आई-वडील 3/4 दिवसांपासून आजारी असल्याची माहिती मिळत आहे. त्या सर्वांना  थंडी, ताप, सर्दी व खोकला जाणवत असल्याने डेंग्यू सदृश आजाराची शक्यता वर्तविण्यात येत आहे. परंतु उपलब्ध माहितीनुसार मक्याला कीड लागू नये म्हणून लावण्यात येणार्‍या औषधाचा घरातील हवेवर परिणाम होवून या प्रदूषित हवेत श्‍वासोच्छवास घेतल्याने मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. काही वेळा फुफ्फुस, किडनी आदी अवयवांवरही त्याचा परिणाम होत असल्याचे सांगण्यात येते. तसा काहीसा प्रकार कदम कुटुंबीयांच्याबाबतीत घडला असण्याची शक्यता प्रथमदर्शनी व्यक्त होत आहे. तथापि, मुलांचा शवविच्छेदन अहवाल व राखून ठेवलेल्या व्हीसेराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर याबाबतची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.
या मुलांचे वडील संतोष वामन कदम (वय 40) व सौ.पूजा संतोष कदम (वय 35) यांनाही अशाचप्रकारे त्रास होत असल्याने येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथून त्यांना अधिक उपचारासाठी पुणे येथे पाठविण्यात आले. बुधवारी त्यांना पुन्हा फलटण येथे आणून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तेथे रुग्णालयाचे अधीक्षक सुभाष गायकवाड व त्यांचे सहकारी त्यांच्यावर उपचार करीत आहेत, दरम्यान, शहरातील प्रख्यात हृदयरोग तज्ञ जे. टी. पोळ यांना उपजिल्हा रुग्णालयात बोलावून या दोघांना तपासण्याची विनंती केली असता त्यांनी दोघांची प्रकृती तपासली आहे. मात्र वैद्यकीय तपासण्या पूर्ण झाल्यानंतरच योग्य निदान करता येईल. प्रथमदर्शनी कीटकनाशक औषधाचा परिणाम असण्याची शक्यता त्यांनीही प्रथमदर्शनी व्यक्त केली आहे. दरम्यान, उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. सुभाष गायकवाड, डॉ. अंशुमन धुमाळ व त्यांच्या सहकार्‍यांनी या दोघांना पुन्हा पुणे येथे पाठविण्याची आवश्यकता व्यक्त केली आहे. अधिक उपचारासाठी या दोघांना पुणे येथे पाठविण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, शिवानी संतोष कदम (वय 11 महिने) या मुलीच्या पार्थिवावर मंगळवारी अंत्यसंस्कार करण्यात आले तर चि. शिवराज संतोष कदम (वय 4 वर्षे) यांचे उपजिल्हा रुग्णालयात बुधवारी शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर त्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी आई-वडील दोघे उपस्थित होते.
 संतोष वामन कदम (वय 40), रा. वाठार निंबाळकर, सौ. पूजा संतोष कदम (वय 38)   या कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची असून संतोष कदम गवंडीकाम करून मिळणार्‍या उत्पन्नातून प्रपंचाचा गाडा चालवितात. त्यांच्यावर कोसळलेल्या या भीषण आपत्तीत वाठार निंबाळकर व परिसरातील ग्रामस्थांमधून हळहळ व्यक्त होत आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांनी शहरात खाजगी रुग्णालयात जावून उपचार घेण्यापेक्षा स्थानिक डॉक्टरांकडूनच उपचार घेणे पसंत केले. अशावेळी शासकीय आरोग्य यंत्रणा तातडीने त्यांच्या पाठीशी उभी राहिली असती तर वेगळे चित्र दिसले असते. परंतु दुर्दैवाने त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू शकली नाही. त्यात दोन्ही मुलांचा दुर्दैवी अंत झाला आहे. फलटण शहर आणि ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणावर साथीचे आजार फैलावले आहेत. अनेक गावात रुग्णांची संख्या वाढत असताना शासकीय आरोग्य यंत्रणेने त्याबाबत ठोस भूमिका घेण्याची, ग्रामस्थांना योग्य मार्गदर्शन व उपाययोजना करण्याची आवश्यकता असताना त्याबाबत दक्षता घेण्यासाठी वरिष्ठांपासून कनिष्ठापर्यंत सर्वांनीच योग्य औषधोपचार, साथ नियंत्रणासाठी योग्य उपाययोजना आणि ग्रामस्थांमध्ये प्रबोधन करण्यासाठी तातडीने पुढे आले पाहिज, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. दरम्यान, याबाबत फलटण ग्रामीण       पोलीस ठाण्यात एमएलसीद्वारे दोन्ही बालकांच्या निधनाची नोंद करण्यात आली आहे. त्याबाबत पुढील तपास काय झाला हे लगेच समजू शकले नाही.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: