Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  लोलक  >>  बातम्या

सर्व रोगांवर ‘अक्षीर’ इलाज
vasudeo kulkarni
Wednesday, November 22, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: lolak1
दोन-तीनशे वर्षांपूर्वी भारतात रुग्णांवर आयुर्वेदिक आणि युनानी पद्धतीने वैद्यकीय उपचार केले जात. आदिवासींच्या क्षेत्रात परंपरेने वनस्पतीशास्त्राचे ज्ञान असलेले वैदू औषधे देत. आदिवासी समाजावर तेव्हा आणि सध्याच्या काळातही धार्मिक अंधश्रद्धा-परंपरांचा पगडा कायम असल्याने, आदिवासी औषधी बरोबरच आपल्या गावातल्या परिसरातल्या मांत्रिकाकडे रुग्णाला नेतात. या मांत्रिकांचे मोठे प्रस्थ आदिवासी समाजात आहे. पूर्वी ग्रामीण भागात आदिवासीतले वैद्य ‘सर्व रोगांवर अक्षीर इलाज’, अशा आरोळ्या ठोकत गल्लीबोळातून फिरत असत. लोकांना औषधेही देत असत. त्यांना परंपरेने औषधांचे ज्ञानही होते आणि आहे. अलीकडच्या काळात अ‍ॅलोपॅथी शास्त्राने प्रचंड प्रगती केली. ग्रामीण भागापर्यंत अत्याधुनिक उपकरणे आणि वैद्यकीय यंत्रसामुग्रीने सज्ज असलेली रुग्णालये सुरू झाली. परदेशातले रुग्णही भारतातल्या विशेष रुग्णालयात उपचारासाठी येतात. पण, उच्च पदवीधर आणि विज्ञान शाखेचे पदवीधर असलेले काही लोक, सुशिक्षित आणि खुद्द काही डॉक्टरही ढोंगी बुवा साधूंच्या नादाला लागतात. आपल्या जीवनातले अस्वास्थ, आजारपण या असल्या भोंदू बुवांच्या अंगार्‍याच्या पुडीने, आशीर्वादाने किंवा तोडग्याने संपेल, असा अंधविश्‍वास या लोकांना वाटतो. भोंदू बुवा साधूंचे प्रस्थ भारतीय समाजात वाढले ते याच मानसिकते-मुळे. गेल्या काही वर्षात आसारामबापू, स्वामी नित्यानंद यांच्यासह अध्यात्माचे साम्राज्य निर्माण करणार्‍या भोंदू बुवांच्या अनंत लीलांचा पंचनामा झाला. कुणी निर्मलबाबा तर दरबार भरवून आपल्या भगतांना, काळ्या कुत्र्याला मंगळवारी संध्याकाळी बिस्किट खायला घाल, तर अमावास्येच्या दिवशी अमुक ठिकाणी दिवा लाव, असले भंपक उपाय सांगत असतो. उपग्रह मनोरंजन वाहिनीवरही त्याचं हे अगाध मार्गदर्शन प्रक्षेपित होते. त्याच्या भगतांचे किती कल्याण झाले, हे माहिती नाही. पण, निर्मलबाबाचे मात्र उखळ पांढरे झाले. तो श्रीमंत झाला. आचार्य अत्रे यांनी ‘बुवा तेथे बाया’ हे नाटक लिहून भारतीय समाजातल्या भोंदू बुवांच्या ढोंगबाजीचे दर्शन लोकांना घडवले होते. संत तुकाराम, संत एकनाथ, समर्थ रामदास, संत गाडगेबाबा यांच्यासह संत मंडळींनी या बुवाबाजी-ढोंगबाजीवर विश्‍वास ठेवू नका, असे टाहो फोडून लोकांना सांगितले. पण,  त्याचाही उपयोग झाला नाही. भारतीय समाजात अगदी उच्च शिक्षितातही अंधश्रद्धांची मानसिकता परंपरेने पुढे चालत राहिली.
असाध्य विकाराने रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या रुग्णावरच्या वैद्यकीय उपचारांना मर्यादा असतेच. कोणत्याच औषधांचा रुग्णाच्या आजारपणावर परिणाम होत नाही, असे लक्षात येताच त्याच्यावर उपचार करणारे डॉक्टरही आता सर्व त्या सर्वसाक्षी परमेश्‍वराच्या हाती असल्याचे, रुग्णाच्या आप्तांना सांगतात. डॉक्टर रुग्णांना मानसिक आधार देतातच. त्याला औषधांचीही जोड असतेच. पण, राजस्थानातल्या भरतपूर या शहरात रुग्णावर उपचार करणारे डॉ. दिनेश शर्मा हे रुग्णाला तपासल्यावर, त्याला जी औषधे नियमितपणे घ्यायला सांगतात, त्यात रोजच्या रोज ‘हनुमान चालिसा’ चा पाठ रुग्णाने केलाच पाहिजे, असे आवर्जून लिहलेले असते. चार पाच औषधांच्याबरोबरच ते हनुमान चालिसाचा पाठ करा, म्हणजे या औषधांचा अधिक उपयोग होईल, असे आपल्या रुग्णांना सांगतात. एम. डी. (मेडिसीन) ही उच्च पदवी असलेले डॉ. शर्मा यांनी सरकारी वैद्यकीय सेवेतून निवृत्त झाल्यावर खाजगी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. सत्तर वर्षे वयाचे डॉ. शर्मा हे हृदयरोग तज्ञ आहेत. त्यांच्या औषधांनी
गुण येतो, असा रुग्णांचा विश्‍वासही आहे. त्यांचे रोगनिदानही अचूक असल्याने, ते लोकप्रिय आहेत. आपल्या वैद्यकीय यशाचे श्रेयही ते परमेश्‍वरालाच देतात. ‘डॉक्टर
सिर्फ इलाज करता हैं, ठीक भगवान
करता हैं।’ असे ते आपल्या रुग्णांना आवर्जून सांगतात. औषधाबरोबरच रुग्णांना अध्यात्मिक औषधाचा डोसही अत्यावश्यकच असल्याचे सांगणार्‍या डॉ. शर्मा यांचा ‘हनुमान
चालिसा’ हा सर्व रोगांवरचा अक्षीर इलाज आहे.         
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: