Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वेण्णा लेकची गळती दोन महिन्यांनी आटोक्यात
vasudeo kulkarni
Tuesday, November 21, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: re5
80 टक्के गळती थांबली; पुन्हा प्रयत्न करणार
5महाबळेश्‍वर, दि. 20 : येथील प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या भिंतीच्या पायातून प्रचंड प्रमाणात होणारी गळती महाबळेश्‍वर पालिकेच्या सुमारे सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर काबूत आली. सुमारे 80 टक्के गळती थांबल्याचे सोमवारी निदर्शनास आले.
महाबळेश्‍वर येथील प्रसिद्ध वेण्णा तलावाच्या भिंतीच्या पायातून गेले दोन-तीन महिने मोठ्या प्रमाणात पाणी गळती सुरू होती. त्याबाबत नगरसेवक रवींद्र कुंभारदरे यांनी त्यावर वृत्तपत्रांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकल्यावर प्रशासन खडबडून जागे झाले. या तलावातून महाबळेश्‍वर व पाचगणी या पर्यटनस्थळांना पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे दिवसेंदिवस वाढणारी गळती या दोन्ही पर्यटनस्थळांसाठी चिंतेचे कारण झाले होते. ही गळती वेळीच थांबली नाही तर धरणाच्या भिंतीस मोठे भगदाड पडून वेण्णा नदीकाठालगतच्या गावांनाही धोका होणार होता.
प्रसारमाध्यमांनी आवाज उठवल्यानंतर आ. मकरंद पाटील व संबंधित खात्याच्या वरिष्ठांनी पाहणी करून उपाययोजना ठरवल्या होत्या. मात्र, त्यास फारशी गती नव्हती. ही बाब गंभीर असल्याने जिल्हाधिकारी श्‍वेता सिंघल यांनी संबंधित खात्याच्या अधिकार्‍यांना नुकत्याच सूचना दिल्या होत्या. दरम्यान, रविवारी जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता विजय घोगरे यांच्यसमवेत तज्ज्ञांच्या पथकाने गळती होत असलेल्या धरण भिंतीच्या पायालगतच्या भागाची पाहणी केली. यावेळी महाबळेश्‍वरच्या नगराध्यक्षा सौ. स्वप्नाली शिंदे, उपनगराध्यक्ष अफझल सुतार, नगरसेवक कुमार शिंदे, रवींद्र कुंभारदरे, अन्य नगरसेवक तहसीलदार रमेश शेंडगे, महाबळेश्‍वर  ट्रेकर्सचे सुनील भाटिया आदी उपस्थित होते. यावेळी पथकातील गळती तज्ज्ञ विजय शिवतारे व अन्य कर्मचार्‍यांना पायालगतच्या भागात मोठा खड्डा व भोवरा असल्याचे आढळून आले. त्यांनी आपल्या अनुभवाप्रमाणे गळती या खड्ड्यातून व भोवर्‍यातूनच होत आहे का, याची तपासणी केली.   
त्यासाठी त्यांनी कापूस व कापडाचा वापर केला. त्यांची खात्री पटल्यानंतर हालचालींना वेग आला. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार नगरसेवक कुमार शिंदे व सुनील भाटिया यांनी पालिकेचा स्वच्छता विभाग व अन्य विभागांचे कर्मचारी, वेण्णा तलाव बोट क्लबचे कर्मचारी यांच्या मदतीने या खड्ड्यात कापड, कापूस व चिंध्या टाकून गळती बंद करण्याचा प्रयत्न केला. मात्र, कापड व कापूस कमी पडू लागला. थंडीचा कडका असतानाही रात्रीच्या अंधारात सर्चलाईटच्या मदतीने तलावातील पाण्यात उतरून पालिकेचे कर्मचारी कुमार शिंदे, सुनील भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम मध्यरात्री 1 वाजेपर्यंत करत होते. त्यासाठी त्यांनी रातोरात संपूर्ण महाबळेश्‍वर शहर पालथे घालून हॉटेल्स, लॉजेस, अंजूमन हायस्कूल व अन्य भागातून सुमारे दोन ट्रक कापड, कापूस व चिंध्या आणून त्या तलावातील खड्ड्यात व भोवर्‍यात भरल्या. जेसीबीच्या सहाय्याने त्यावर माती टाकली. रात्री आठ वाजता सुरू झालेले हे काम सहा तासांच्या अथक प्रयत्नांनंतर थांबले. दरम्यान, सोमवारी सकाळी वेण्णा तलावाची पाहणी केली असता 80 टक्के गळती आटोक्यात आल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या पर्यटनस्थळांच्या
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सध्याची उपाययोजना कायमची नसून धरण भिंतीतून होणारी गळती कायमस्वरूपी थांबण्यासाठी पाणी कमी झाल्यानंतर प्रयत्न करण्यात येणार असल्याची माहिती कुमार शिंदे यांनी दिली.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: