Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सोलापूर जिल्ह्यात ऊसदर आंदोलन हिंसक
ऐक्य समूह
Monday, November 20, 2017 AT 11:32 AM (IST)
Tags: mn4
बसच्या जाळपोळीचा प्रयत्न फसला
5 सोलापूर, दि. 19 (वृत्तसंस्था) : ऊसदरासाठी शेतकर्‍यांनी सोलापूर जिल्ह्यात सुरू केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. पंढरपूर व अकलूज या तालुक्यांमध्ये आंदोलनाला तीव्र स्वरूप आले आहे. पंढरपूर तालुक्यातील भंडीशेगाव येथे अकलूज-सोलापूर एस. टी. बस पेटवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, पोलीस वेळेवर पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला.
दरम्यान, शेतकर्‍यांच्या उसाला योग्य दर मिळायलाच हवा. राज्य सरकारला जबाबदारी टाळता येणार नाही. शेतकर्‍यांच्या संयमाचा बांध फुटत चालला आहे. आता आंदोलन शेतकर्‍यांनी हातात घेतले असून देशद्रोहाचा खटला जरी भरला तरी माघार घेणार नसल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सोलापूर येथे पत्रकार परिषदेत दिला. कारखानदार आणि सरकारचे साटेलोटे असून सरकारला शेतकर्‍यांच्या रक्ताचा नैवेद्य हवा आहे का, असा सवालही त्यांनी केला.
कोल्हापूर, सांगली, सातारा, नंदूरबारमध्ये ऊसदराचा प्रश्‍न मार्गी लागला आहे. मात्र, सोलापूर जिल्ह्यात सरकार कारखानदारांना पाठीशी घालत आहे. आम्ही तडजोडीला तयार आहोत; परंतु सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरले आहे. कारखानदार कारखाने बंद करण्याची मस्तवाल भाषा करत आहेत. त्यांनी तसे केल्यास आम्ही आमचा ऊस सांगली, कोल्हापूर आणि कर्नाटकच्या कारखान्यांना घालू.   
शेतकर्‍यांचा संयम सुटत चालला असून ते छातीवर गोळ्या झेलण्यासही तयार आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, ऊसदर आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. आज सकाळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोनके येथे लाकडे जाळून कराड रस्त्यावरील वाहतूक बंद पाडली. टेंभुर्णी रस्त्यावरील भोसेजवळ रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकर्‍यांनी चक्का जाम केला. पंढरपूर-सातारा रस्त्यावर काल रात्री एस. टी. बस फोडण्यात आली. माढा तालुक्यात रिधोरा येथेही दोन बसेसची तोडफोड करण्यात आली. भंडीशेगाव येथे अकलूज-सोलापूर बसवर दगडफेक करत पेट्रोल टाकण्याचा प्रयत्न झाला. आंदोलकांनी चालक-वाहक व प्रवाशांना खाली उतरवून बसच्या काचा फोडल्या. त्यानंतर बसमध्ये पेट्रोल ओतले. मात्र, पोलीस वेळीच दाखल झाल्याने अनर्थ टळला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: