Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
ऊसदराबाबत सरकार चर्चेसाठी तयार
ऐक्य समूह
Thursday, November 16, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: mn4
शेतकर्‍यांना हिंसक आंदोलन सोडण्याचे आवाहन
5मुंबई, दि. 15 (प्रतिनिधी) :ऊसदरासाठी शेतकर्‍यांनी सुरू केलेल्या आंदोलनाचे लोण राज्यभर पसरत चालले असून काही ठिकाणी आंदोलनाला हिंसक वळणही लागले आहे. सहकारी साखर कारखाने शेतकर्‍यांचेच असून हिंसक आंदोलनामुळे त्यांचेच नुकसान होणार आहे. सरकार चर्चेला तयार असून एफआरपीपेक्षा कमी दर देणार्‍या कारखान्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी आंदोलन मागे घ्यावे, असे आवाहन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केले आहे.
ऊसदरासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर बोलताना सुभाष देशमुख यांनी शेतकर्‍यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्याची तयारी असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षीच्या एफआरपीच्या तुलनेत यावर्षी 250 रुपये जास्त दर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकतीच कोल्हापूर येथे तर मी स्वतः पुणे येथे या प्रश्‍नी बैठक घेतली होती. या बैठकांमध्ये एफआरपी व्यतिरिक्त 200 रुपये जास्त दर देण्याचे अनेक कारखान्यांनी मान्य केले आहे. त्यातील 100 रुपये आता व उर्वरित 100 रुपये साखरेच्या विक्रीनंतर देण्याचे त्यांनी मान्य केले आहे. इतरही कारखाने हा फॉर्म्युला मान्य करतील. हिंसक आंदोलने करून शेतकर्‍यांचेच नुकसान होत आहे. गाड्या अडविल्या गेल्याने शेतकर्‍यांचाच माल पडून राहत आहे. शेतकर्‍यांच्या सर्व मागण्यांवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार आहे. त्यामुळे शेतकर्‍यांनी हिंसक आंदोलन सोडून चर्चा करावी, असे आवाहन सुभाष देशमुख यांनी केले.
वजनकाट्याच्या तपासणीसाठी खास पथक
वजनकाट्यांमधील घोळामुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असते. ते रोखण्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली खास पथक तयार करण्यात आले आहे. या पथकात पोलीस, महसूल विभागाचे अधिकारी व शेतकर्‍यांच्या प्रतिनिधींचा समावेश असणार आहे. ज्या ठिकाणी संशय असेल, अशा ठिकाणी हे पथक जाऊन वजनकाट्यांची तपासणी करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. जो कारखाना एफआरपीपेक्षा कमी दर देईल, त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. जो कारखाना सुस्थितीत असेल, त्याने एफआरपीपेक्षा जास्त दर दिला तर त्याचे स्वागतच असल्याचे देशमुख म्हणाले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: