Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘हिट अँड रन’ प्रकरणी सलमानच्या अडचणीत वाढ?
ऐक्य समूह
Wednesday, November 15, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: na5
राज्य सरकारच्या अपिलावर सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार
5नवी दिल्ली, दि. 14 (वृतसंस्था) :मुंबईतील 2002 सालच्या ‘हिट अँड रन’ प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने बॉलिवूड अभिनेता सलमान खानला निर्दोष ठरवल्याच्या विरोधात राज्य सरकारने केलेल्या याचिकेवर तब्बल 12 आठवड्यांनंतर सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी घेण्याचे ठरवले आहे. त्यामुळे सलमान खानच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारच्या याचिकेवरील सुनावणी तीन महिन्यांनंतर घेण्यात येणार असल्याचे सरन्यायाधीश दीपक मिश्रा, न्या. ए. एम. खानविलकर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले आहे. त्याचे कारण या पूर्वीच्या खंडपीठाने या याचिकेवरील सुनावणीसाठी महाराष्ट्र सरकारला कालावधी दिला होता. सर्वोच्च न्यायालयाने फेब्रुवारी महिन्यात सलमान खानला महाराष्ट्र सरकारच्या याचिकेवर आपले म्हणणे मांडण्यास सांगितले होते. या प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने सलमान खानची निर्दोष मुक्तता केली होती.
2002 मध्ये मुंबईतील वांद्रे परिसरात सलमानने मद्यधुंद अवस्थेत कार चालवून अपघात केला होता. 
त्यामध्ये एकाचा मृत्यू झाला होता तर चार जण जखमी झाले होते, असा आरोप सलमानवर होता. या प्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा ठोठावली होती. मात्र, सलमानच्या अपिलावर मुंबई उच्च न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली होती. या प्रकरणात न्याय झाला नसल्याची प्रतिक्रिया राज्य सरकारने उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर व्यक्त केली होती. अपघात घडला तेव्हा सलमान स्वत: कार चालवत होता, अशी साक्ष पोलीस आणि जखमींनी दिली होती. त्यावेळी कारमध्ये असलेला सलमानचा अंगरक्षक आणि पोलीस हवालदारानेही अशीच साक्ष दिली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: