Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी अनुपम खेर
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: mn3
5पुणे, दि. 11 (प्रतिनिधी): पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (एफटीआयआय) या संस्थेच्या अध्यक्षपदावरून वादग्रस्त गजेंद्र चौहान यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. त्यांच्या जागी हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 
अभिनेते गजेंद्र चौहान यांची जून 2015 मध्ये ‘एफटीआयआय’च्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. त्यांच्या अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरून एफटीआयआयमध्ये वाद झाला होता. या नियुक्तीच्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी 141 दिवस आंदोलन केले होते. मात्र, त्यानंतर हा वाद निवळला होता. चौहान यांचा अध्यक्षपदाचा कार्यकाळ यावर्षी 3 मार्च रोजी संपुष्टात आला होता. मात्र, नवी नियुक्ती झाली नसल्याने चौहान यांच्याकडेच पदभार होता. त्यांच्या जागी अन्य कलाकाराची नियुक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती. अखेर अनुपम खेर यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.   
अनुपम खेर हे मोदींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यांची पत्नी व अभिनेत्री किरण खेर या भाजपच्या खासदार आहेत. गजेंद्र चौहान यांच्या नियुक्तीवरून वाद पेटला असताना अनुपम खेर यांनी सरकारची बाजू लावून धरली होती. त्याचे फळ म्हणून खेर यांची एफटीआयआयच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याची चर्चा आहे. 62 वर्षीय खेर हे सकस अभिनेते असून त्यांनी आजवर 500 हून अधिक चित्रपटांमध्ये खलनायक व चरित्रनायकाच्या भूमिका साकारल्या आहेत. ‘सारांश’, ‘डॅडी’, ‘रामलखन’, ‘लम्हे’, ‘खेल’, ‘दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे’, ‘मैने गांधी को नही मारा’, ‘अ वेन्सडे’ अशा अनेक चित्रपटांमधील त्यांच्या भूमिका गाजलेल्या आहेत. त्यांनी ‘ओम जय जगदीश’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले होते. खेर यांनी ‘बेंड इट लाईक बेकहॅम’, ‘ब्राईड अँड प्रेज्युडाईस’, ‘सिल्व्हर लायनिंग्ज प्लेबुक’, ‘द बिग सिक’ अशा हॉलीवूडपटांमध्येही भूमिका केल्या आहेत. ते नामवंत निर्माता, अभिनेता व शिक्षक म्हणून ओळखले जातात. त्यांनी या आधी सेन्सॉर बोर्ड आणि नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा या नामांकित संस्थांचे संचालकपद भूषविले होते. अनुपम खेर यांना 2004 साली पद्मश्री तर 2016 साली पद्मभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: