Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महाराष्ट्राच्या सुपुत्रासह दोन जवानांना वीरमरण
ऐक्य समूह
Thursday, October 12, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: na2
काश्मीरमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा
5श्रीनगर, दि. 11 (वृत्तसंस्था) :जम्मू-काश्मीरच्या बंदीपोरा येथील हाजिन भागात दहशतवाद्यांबरोबर बुधवारीसकाळी झालेल्या चकमकीत हवाई दलाच्या ‘गरूड’ पथकाचे दोन जवान शहीद झाले. त्यामध्ये महाराष्ट्राचे सुपुत्र मिलिंद खैरनार यांचा समावेश आहे. दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात सुरक्षा दलांना यश आले. हे दहशतवादी ‘लष्कर-ए-तोयबा’ या संघटनेचे होते, अशी माहिती सूत्रांनी दिली. या चकमकीत लष्कराचे दोन जवान जखमी झाले आहेत.
बंदीपोरा येथील हाजिन भागातील परिबाल या गावात ‘तोयबा’चे दहशतवादी लपल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानुसार लष्कर आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी या भागात शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत हवाई दलाच्या ‘गरूड’ स्न्वॉडचे जवानही सहभागी झाले होते. शोधमोहिमेचा अनुभव आणि प्रशिक्षण मिळावे यासाठी लष्कराच्या तुकडीबरोबर हवाई दलाच्या ’गरूड’ पथकातील जवानांना सहभागी करून घेण्यात आले होते, अशी माहिती संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिली.
सुरक्षा दलांची शोधमोहीम सुरू असताना दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. त्याला सुरक्षा दलांच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. पहाटे पावणेपाचवाजल्यापासून ही चकमक सुरू होती. या चकमकीत दोन दहशतवाद्यांना ठार करण्यात आले तर हवाई दलाचे दोनजवान शहीद झाले.  
त्यामध्ये महाराष्ट्राच्या धुळे जिल्ह्यातील साक्री गावाचे रहिवासी असलेल्या मिलिंद खैरनार आणि नीलेशकुमार नायर यांना वीरमरण
आले. हे दोघेही हवाई दलाच्या ‘गरूड’ या विशेष पथकात कार्यरत होते. या चकमकीत 13 राष्ट्रीय रायफल्सचे दोन जवान जखमी झ
ाले आहेत. जखमींना लष्कराच्या तळावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या महिन्याच्या शेवटी दहशतवाद्यांनी सीमा सुरक्षा दलाचे जवान रमझान परे यांची परे मोहल्ला येथे घरात घुसून हत्या केली होती. रमझान परे हे सुट्टीवर होते. त्यानंतर गेल्या दोन आठवड्यांपासून सुरक्षा दलांनी हाजिन शहर आणि परिसरात दहशतवाद्यांविरोधात अनेक शोधमोहिमा राबवल्या आहेत.
या भागात अनेक दहशतवादी लपून बसल्याची माहिती जम्मू-काश्मीर पोलिसांकडे आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या आहेत. श्रीनगरमध्ये मंगळवारी केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या वाहनावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. यावेळी जवानांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात एक दहशतवादी मारला गेला. त्या आधी सोमवारी बडगाममध्ये दहशतवाद्यांविरुद्ध झालेल्या चकमकीत भारतीय लष्कराचे सुभेदार राजकुमार यांना वीरमरण आले होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: