Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘जैश-ए-मोहम्मद’चा कमांडर खालिद अहमदचा खात्मा
ऐक्य समूह
Tuesday, October 10, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: na1
‘हिजबुल’च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान
5श्रीनगर, दि. 9 (वृत्तसंस्था) :उत्तर काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या छावण्यांवरील अनेक हल्ल्यांमध्ये सहभागी असलेला ‘जैश-ए-मोहम्मद’ या पाकस्थित दहशतवादी संघटनेचा कमांडर खालिद अहमदचा सुरक्षा दलांनी लाडुरा भागात खात्मा केला.
सुरक्षा दलांच्या दृष्टीने हे महत्त्वाचेयश मानले जाते. त्यानंतर काश्मीरमधील शोपियाँ भागात ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले. या कारवायांमुळे दहशतवादी संघटनांना मोठा दणका बसला आहे. खालिद मोहम्मदचा लष्करी ठाण्यांवर हल्ले करणे, पोलिसांना लक्ष्य करणे, अशा अनेक दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग होता.
खालिद मोहम्मद हा पाकिस्तानी नागरिक असून भारतीय लष्कराने त्याचा समावेश ‘अ++’ श्रेणीतील म्हणजेच सर्वाधिक ‘वाँटेड’ दहशतवाद्यांच्या यादीत केला होता. त्याच्यावर सात लाख रुपयांचे इनाम होते. त्याला जम्मू-काश्मीर पोलिसांचे विशेष कृती पथक, स्थानिक पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल आणि लष्कराच्या संयुक्त कारवाईत ठार केल्याचे जम्मू-काश्मीरचे पोलीस महासंचालक एस. पी. वैद यांनी सांगितले.
उत्तर काश्मीरमधील लाडुरा भागात काही दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी दहशतवाद्यांनी जवानांच्या दिशेने गोळीबार करत सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. तेथून त्यांचा गोळीबार सुरू होता. त्याला सुरक्षा दलांच्या जवानांनी प्रत्युत्तर दिले. ही चकमक सुरू झाल्यानंतर तेथेआणखी कुमक पाठवण्यात आली. 
सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घालून दहशतवाद्यांभोवतीचा फास आवळला. या चकमकीत खालिद मारला गेला. श्रीनगर विमानतळाजवळील सीमा सुरक्षा दलाच्या बटालियनच्या छावणीवर आणि पुलवामामधील पोलीस वसाहतीत झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमधील खालिदच्या सहभागाबाबत तपास सुरू आहे.
खालिद हा पाकिस्तानी नागरिक होता. तो उत्तर काश्मीरमध्ये गेल्या काही वर्षांपासून कार्यरत होता. ‘जैश-ए-मोहम्मद’मध्ये काश्मिरी तरुणांना भरती करून घेण्याची जबाबदारीही त्याच्यावर होती. काही दिवसांपूर्वी हंदवाडामध्ये विशेष पोलीस अधिकारी आणि त्यांच्या सात वर्षांच्या मुलावर खालिदनेच हल्ला केला होता.
खालिदचे उत्तर काश्मीरमधील 20 वर्षांच्या एका तरुणीशी प्रेमसंबंध होते. त्यातून ती तरुणी गर्भवती राहिली होती. मात्र, गर्भातील बाळाशी आपला काही संबंध नाही, असे सांगून खालिदने तिच्याशी संबंध तोडले होते. त्यानंतर त्या तरुणीने भावासमवेत पंजाबमधील जालंधर येथे जाऊन गर्भपात केला होता. तेथून जम्मू-काश्मीरमध्ये परतल्यानंतर तिने खालिदला संपवण्याची शपथ घेतली होती. खालिद हा लाडुरा भागात आल्याची माहिती या तरुणीच्या कुटुंबीयांनीच सुरक्षा दलांना दिल्याचे समजते. दहशतवादी कारवायांमध्ये गुंतलेल्या खालिदने अनेक काश्मिरी तरुणींना भुरळ घातली होती. शेवटच्या काही दिवसांत त्याच्या तीन ते चार प्रेयसी होत्या, असे समजते.
जवान शहीद, तीन दहशतवादी ठार
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकीत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला. सुभेदार राजकुमार असे या जवानाचे नाव आहे. बडगाममधील खाग भागात ही चकमक झाली. या चकमकीनंतर सुरक्षा दलांची सोमवारी सायंकाळी शोपियाँ भागातही ‘हिजबुल मुजाहिद्दीन’च्या दहशतवाद्यांशी चकमक झाली. या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलांना यश आले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: