Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कोणत्याही क्षणी युद्धासाठी हवाई दल सज्ज
ऐक्य समूह
Monday, October 09, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: mn1
5हिंडन, दि. 8 (वृत्तसंस्था) : भारताला युद्ध नको आहे तर शांतता हवी आहे. मात्र, तशी परिस्थिती निर्माण झाली तर कोणत्याही क्षणी युद्धासाठी हवाई दल सज्ज आहे, असा विश्‍वास हवाई दलप्रमुख वीरेंद्रसिंग धनोआ यांनी व्यक्त केला. देशासमोर सुरक्षेचे आव्हान निर्माण झाल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याचे सामर्थ्यही हवाई दलाकडे आहे, असेही ते म्हणाले.
भारतीय हवाई दलाच्या 85 व्या स्थापनादिनी गाझियाबादमधील हिंडन हवाई तळावर रविवारी झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी हवाई दलाने जोरदार शक्तिप्रदर्शन केले. यावेळी झालेल्या हवाई कसरतींमध्ये सुखोई, तेजस, मिराज, मिग, ही लढाऊ विमाने, सी-17, सी-130 ही मालवाहू विमाने आणि हेलिकॉप्टर यांचाही समावेश होता. यावेळी हवाई दलाने चित्तथरारक प्रात्यक्षिके केली.
युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास त्यासाठी अगदी कमी वेळातही हवाई दल सज्ज असल्याचे धनोआ यांनी सांगितले. धनोआ हे 25 वे एअर चीफ मार्शल आहेत. भारतीय उपखंडात भू-राजकीय परिस्थिती अस्थिर असल्याने हवाई दलाला लहान आणि युद्ध करावे लागू शकेल. आम्ही अगदी थोड्या वेळातही त्यासाठी सज्ज आहोत. कोणत्याही आणीबाणीच्या प्रसंगाला तोंड देण्याचे सामर्थ्य आमच्याकडे आहे. शत्रूला जशास तसे उत्तर देण्यास आम्ही तयार आहोत, असे ते म्हणाले. डोकलाम येथील संघर्षानंतर चीन दंडातल्या बेटकुळ्या फुगवत आहे तर दुसरीकडे पाकिस्तानकडून जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया केल्या जात आहेत. या पार्श्‍वभूमीवर धनोआ यांनी केलेले वक्तव्य महत्त्वाचे आहे. यावेळी बोलताना धनोआ यांनी देशाच्या सुरक्षेपुढील आव्हानांसह अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. भविष्यात हवाई दल तांत्रिकदृष्ट्या अधिक शक्तिशाली होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली.
मी देशवासीयांना हमी देतो, की माझ्या अधिपत्याखाली असलेले सर्व स्त्री-पुरुष कोणत्याही धोक्याला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत. संपूर्ण हवाई कारवाईसाठी आणि कोणत्याही आव्हानाला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज आहेत, असे धनोआ म्हणाले. यावेळी लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत आणि हवाई दलाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. हवाई दल, लष्कर आणि नौदलाने समन्वयाने सर्व आव्हाने पेलण्याची आवश्यकताही धनोआ यांनी व्यक्त केली.
हवाई दलाची ताकद वाढली आहे. त्यासाठी विमाने आणि शस्त्रसामग्री खरेदीसाठी कार्यक्रम तयार केला आहे. कारवाईची क्षमता वाढविण्यासाठी मजबूत जाळे निर्माण करण्याच्या लक्ष्याच्या आम्ही जवळ आहोत. नवीन युद्धप्रणाली खरेदी करण्याची आणि सध्या हवाई दलाकडे असलेल्या मिराज-2000, मिग-29, जग्वार विमानांचे व शस्त्रप्रणालीचे अद्ययावतीकरण करण्याची  प्रक्रिया सुरू आहे. येत्या काही वर्षांत हवाई दलात 36 राफेल विमाने दाखल होतील. त्याशिवाय संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या लढाऊ जेट विमानांच्या आणि ‘मेक इन इंडिया’ अभियानांतर्गत स्वदेशी बनावटीच्या लष्करी उपकरणांच्या निर्मितीचा निर्णय लवकर घेतल्याने हवाई दलाची कारवाईची क्षमता वाढणार आहे. हवाई दलाला अत्याधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात येत आहे. त्यामुळे हवाई दलाची ताकद वाढल्याचे ते म्हणाले. गेल्या वर्षी पठाणकोटमध्ये हवाई दलाच्या तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर हवाई दलाच्या सर्व तळांवरील सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्या दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद झाले होते तर चार दहशतवादी मारले गेले होते. आता असे संकट आम्ही परतवून लावू शकतो, असेही धनोआ म्हणाले. या कार्यक्रमात त्यांनी हवाई दलाचे पहिले आणि आतापर्यंतचे एकमेव मार्शल अर्जनसिंग आणि शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी हवाई दलाचे मानद कॅप्टन सचिन तेंडुलकर हेदेखील उपस्थित होते. स्थापनादिनाचे औचित्य साधून हवाई दलाने चित्तथरारक प्रात्यक्षिके केली.
हवाई दलाचे ‘एमआय-17 हे हेलिकॉप्टर शुक्रवारी चीन सीमेजवळ तवांग भागात कोसळून 7 जवानांचा मृत्यू झाला होता. या जवानांनाही धनोआ यांनी श्रद्धांजली वाहिली. शांततेच्या काळात हवाई दलाच्या विमानांचे आणि हेलिकॉप्टरचे अपघात होत असल्याबद्दलही धनोआ यांनी चिंता व्यक्त केली. हे अपघात टाळून हवाई दलाची संपत्ती जपण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: