Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
वाहतूकदारांचे दोन दिवस चक्काजाम आंदोलन
ऐक्य समूह
Saturday, October 07, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: lo2
दि. 9 व 10 रोजी वाहतूक बंद ठेवणार
5सातारा, दि. 6 : वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) कायद्यांतर्गत नोंदणीचे बंधन करू नये, डिझेलवरील कर कमी करावेत, देशभरात एकच पेट्रोल व डिझेलचे दर एकसमान ठेवावेत यासह विविध मागण्यांसाठी आणि केंद्र सरकारच्या जाचक नियमांविरोधात ऑल इंडिया मोटर ट्रान्स्पोर्ट काँग्रेसने (एमआयएमटीसी)     दि. 9 व 10 ऑक्टोबर रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती सातारा जिल्हा ट्रान्स्पोर्ट माल व प्रवासी असोसिएशनचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.
गवळी म्हणाले, डिझेलवरील कर कमी करावेत आणि देशभरात डिझेल व पेट्रोलचे दर एकसमान असावेत. वाहतूकदारांना ‘जीएसटी’अंतर्गत नोंदणीचे बंधन करू नये, अशा एमआयएमटीसीच्या मागण्या आहेत. एमआयएमटीसीचे देशभरात 93 लाख मालवाहतूकदार आणि 50 लाखाहून अधिक बस व पर्यटक ऑपरेटर आहेत. मालवाहतूकदार वाहन खरेदी केल्यापासून शासनाचे विविध कर भरत असतो. नोटाबंदीमुळे वाहतूकदारांवर मोठा परिणाम झाला होता. त्यात आता जीएसटी लागू झाल्याने या व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे. प्रस्तावित ‘ई-वे’ विधेयक  वाहतूकदारांसाठी जाचक आहे. ही सर्व जाचक बंधने दूर करावीत, अशी संघटनेची मागणी आहे. त्याचबरोबर वाहतूकदारांना परिवहन विभाग व पोलीस यंत्रणेकडून सातत्याने जाच केला जातो. त्यावर निर्बंध घालण्यात यावा. वाहतूकदारांकडून महामार्गावर जास्त पैशांची मागणी केली जाते. सातारा जिल्ह्यात महामार्ग पोलीस, जिल्हा पोलीस, तालुका पोलीस, पोलीस ठाण्यांमध्ये नियुक्त असलेले पोलीस, वाहतूक पोलीस, रात्रगस्त घालणारे पोलीस वाहतूकदारांकडून वारेमाप पैसा उकळतात. फक्त सातारा जिल्ह्यातच असलेला हा प्रकार थांबवावा. गाडीच्या पासिंगसाठी टॅ्रक व अन्य सुविधा उपलब्ध कराव्यात. गाड्यांना विशिष्ट कंपनीचेच रेडियम लावण्याचे बंधन नको. त्यामुळे वाहतूकदारांच्या गाड्यांचे महिना महिना पासिंग होत नाही. आंतरराष्ट्रीय बाजारात डिझेलचे दर कमी असताना आपल्या देशात डिझेलचे दर वाढत आहेत. अन्य राज्ये आणि महाराष्ट्रात डिझेलच्या दरात फरक आहे. शेजारच्या कर्नाटकातील आणि महाराष्ट्रातील डिझेलच्या दरात  8 ते 9 रुपयांचा फरक आहे. त्यामुळे राज्यात डिझेलवरील अतिरिक्त अधिभार कमी करावेत. गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांनी डिझेलवरील कर कमी केल्याने तेथील वाहतूकदारांची वाहने महाराष्ट्रात माल आणताना येथे डिझेल भरत नाहीत. त्यामुळे त्यांचा फायदा होतो; परंतु राज्यातील वाहतूकदारांचे डिझेलवरील अधिभारामुळे नुकसान होत आहे. त्यामुळे संपूर्ण देशभर डिझेलचा दर एकसारखा असावा. सातारा ते देहू रोड दरम्यानच्या महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे आहे. त्यामध्ये भ्रष्टाचार आहे. राज्यात महामार्गांवर स्वच्छतागृहे व अन्य आवश्यक सुविधा नाहीत. कराड तालुक्यातील तासवडे टोल नाक्यावर प्रवासी व वाहनधारकांची फसवणूक केली जाते. टोल नाक्यावर सुविधा नाहीत. टोलनाक्यावर क्रेन, पार्किंग या सुविधा वाहतूकदारांना मिळाव्यात. वाहतूकदारांच्या विविध मागण्यांसाठी दि. 9 आणि 10 रोजी देशव्यापी चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलना दरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास सरकार जबाबदार राहील. या दोन दिवसांत वाहतूकदारांच्या मागण्यांवर निर्णय न झाल्यास आगामी काळात बेमुदत चक्काजाम आंदोलन करण्यात येईल, असा इशारा गवळी यांनी दिला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: