Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
उदयनराजेंच्या दणक्याने टोल वसुली तीन तास बंद
ऐक्य समूह
Friday, October 06, 2017 AT 11:34 AM (IST)
Tags: re2
आनेवाडी टोल नाक्यावर तणाव; पोलिसांचा फौजफाटा तैनात
5भुईंज, दि. 5 : टोल नाक्याचे व्यवस्थापन बदलण्याचा विषय सध्या सातारा जिल्ह्यात गाजत असून त्याच विषयाच्या अनुषंगाने खा.श्री. छ. उदयनराजेभोसले यांनी गुरुवारी सायंकाळी आनेवाडी टोल नाक्यावरची टोलवसुली बंद करून खळबळ उडवून दिली. ‘वाहने  सोडा, कोण अडवतयं ते बघतोच’ अशा शब्दात खा.उदयनराजे यांनी आपल्या स्टाईलने आवाज टाकल्यानंतर तेथे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावेळी खा. उदयनराजे समर्थकांनी गर्दी केली होती.
खा. उदयनराजे आनेवाडी टोल नाक्यावर आल्याची माहिती समजताच वाई पोलिसांची मोठी कुमक टोल नाक्याकडे रवाना झाली. हा प्रकार सुरू झाल्यानंतर तब्बल तीन तास टोल वसुली बंद होती. रात्री उशिरापर्यंत टोल नाक्यावर शांतता होती. विशेष म्हणजे खा. उदयनराजे तेथे येण्यापूर्वीच टोल नाक्यावरील सर्व सीसीटीव्ही बंद करण्यात आले होते.
याबाबत अधिक माहिती अशी, आनेवाडी टोल नाक्यावर गुरुवारी सायंकाळी 6 च्या सुमारास अचानकपणे खा. श्री. छ. उदयनराजे आले.  
त्यांच्यासमवेत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती सुनील काटकर, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य संदीप शिंदे, अशोक सावंत, नितीन शिंदे, दीपक ननावरे यांच्यासह हजारो समर्थक होते.  टोलनाक्यावर आल्यानंतर टोलनाक्याच्या परिसराची पाहणी करत तेथे असणार्‍या कट्ट्यावर त्यांनी बैठक मारली. यावेळी त्यांनी ‘चला रे सोडा सगळ्या गाड्या फुकट, बघतोच कोण अडवतं’ असे सांगत टोलनाक्यावर येत असलेली वाहने फ्री सोडण्यास सुरुवात केली. त्या दरम्यान तेथे मोठा पोलीस फौजफाटा होता. खा. उदयनराजे समर्थकांची गर्दी असल्याने काय भूमिका घ्यावी, असा पेच पोलिसांनाही पडला होता.
 खा. उदयनराजे आनेवाडी टोलनाक्यावर असल्याची बातमी वार्‍यासारखी सगळीकडे पसरली. त्यानंतर आजूबाजूच्या परिसरातील आणि अगदी सातार्‍यातील कार्यकर्तेही मोठ्या संख्येने टोल नाक्यावर गोळा झाले होते.  दोन्ही बाजूच्या टोल नाक्यावरून 8 तासात सुमारे 6 लाखाचे कलेक्शन होत असते. टोल नाका दोन तास फ्री ठेवण्यात आल्याने सुमारे सव्वा लाखाचे कलेक्शन बुडाले असण्याची शक्यता आहे. टोल वसुली बंद असल्याने वातावरण तणावपूर्ण  झाले होते. तणावपूर्ण परिस्थिती झाल्याने काय घडेल हे सांगता येणार नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.   लाठीमार केल्यास गाठ माझ्याशी आहे, असा इशारा खा. उदयनराजेंनी पोलिसांना दिला.  पोलीस सगळा प्रकार शांतपणे बघत होते. दरम्यानच्या काळात खा. उदयनराजे यांनी व्यवस्थापनाशी चर्चा केली. संबंधित कंपनीने आहे तीच यंत्रणा ठेवावी. या टोलनाक्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात येऊ नये, अशा सूचना केल्या.   स्थानिक कामगारांवर अन्याय होऊ देणार नाही आणि मी अजूनही संयम सोडला नाही. व्यवस्थापनाने आहे तीच यंत्रणा न ठेवल्यास मोठा अनर्थ होईल, असेही खा. उदयनराजे यांनी सांगितले.
या घटनेची माहिती पोलीस मुख्यालयाला समजल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे  पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट हे वरिष्ठांच्या सूचनेनुसार आनेवाडी टोल नाक्याकडे रवाना झाले. खा. उदयनराजे यांच्याशी चर्चा करून त्यांनी त्यांना सातार्‍याकडे रवाना होण्याची विनंती केली. घनवट यांच्या विनंतीनुसार खा.उदयनराजे सातार्‍याकडे रवाना झाले.  खा. उदयनराजे यांनी सातार्‍याला रवाना होण्यापूर्वी मी एक तासात येतो, असे उद्गार काढल्याने रात्री उशिरापर्यंत खा. उदयनराजे समर्थकांनी टोलनाक्यावरच तळ ठोकला होता. खा. उदयनराजे गेले तरी टोल नाक्यावर मोठा पोलीस फौजफाटा तैनात होता. खा. उदयनराजे परत येतील, अशी शक्यता असल्याने वातावरण तणावपूर्णच होते. या सगळ्या प्रकारात काही काळासाठी टोल फ्री झाल्याने वाहन चालकांचा चांगलाच फायदा झाला.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: