Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पाकपुरस्कृत दहशतवादामुळे काश्मीर अशांत
ऐक्य समूह
Wednesday, September 13, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: mn1
संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत भारताचा हल्लाबोल
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : सीमेपलीकडून होणार्‍या दहशतवादामुळे जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता आहे. पाकपुरस्कृत दहशतवादामुळे केवळ भारतातच नव्हे तर आशिया खंडातील शांततेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप करताना भारताने संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेत पाकिस्तानवर हल्लाबोल केला.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेच्या 36 व्या सत्रात पाकिस्तानने पुन्हा काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याला भारताचे संयुक्त राष्ट्रांमधील कायमस्वरूपी प्रथम सचिव डॉ. सुमित सेठ यांनी प्रत्युत्तर दिले. या मुस्लीम राष्ट्राच्या भूमीतून होणार्‍या दहशतवादी कारवायांची झळ केवळ भारतालाच नव्हे तर या देशाच्या जवळपास असलेल्या अन्य देशांनाही बसत आहे. त्यातूनही या भागातील दहशतवाद निपटून काढण्यासाठी पाकला सहकार्य करण्याची भारताची तयारी आहे. पाकिस्तानच्या कारवाया लगतच्या शेजारी देशांच्या सीमा ओलांडून इतरही पसरल्या आहेत. आम्ही सर्व देश दहशतवाद निपटून काढण्यासाठी पाकला सहकार्य करण्यास तयार आहोत. मात्र, दहशतवादामुळे आपलाही विनाश होत असल्याची जाणीव होऊन पाकिस्तानने जागे व्हायला पाहिजे, असे डॉ. सेठ म्हणाले.
या परिषदेत सोमवारी बोलताना पाकिस्तानच्या अधिकार्‍यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला होता. काश्मीरमध्ये भारताकडून मानवाधिकारांचे उल्लंघन सुरू असून काश्मिरी जनतेचा स्वयंनिर्णयाचा हक्क डावलला जात आहे, असा आरोप पाकने केला होता. हा आरोप भारताने साफ फेटाळून लावला. बलुचिस्तानमध्ये आपण काय करत आहोत, ते पाकिस्तानने आधी पहावे, अशी चपराक डॉ. सेठ यांनी लगावली. जम्मू-काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि यापुढेही राहील. जम्मू-काश्मीरमधील जनता लोकशाहीने दिलेल्या अधिकारांचा वापर करत आहे. त्याउलट पाकिस्तानकडून बलुचिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरसह त्यांच्याच देशातील नागरिकांच्या मानवाधिकारांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. त्यामुळे मानवाधिकारांबाबत पाकची भूमिका दुटप्पी आणि दांभिक आहे. पाकिस्तानच काश्मीर खोर्‍यात अशांतता पसरवत आहे. मात्र, भारतीय सैन्य तेथे अत्यंत संयम बाळगत असून दहशतवाद्यांशी लढताना सैन्याचे मोठे नुकसान होत आहे. पाकच्या भूमीतून सुरू असलेल्या दहशतवादी कारवायांमुळेच जम्मू-काश्मीरमध्ये अशांतता आहे. अशा कठीण परिस्थितीतही भारतीय सैन्य अत्यंत संयम बाळगून कारवाया करत आहे. त्यामुळे सैन्याची मोठी जीवितहानी होत आहे, असे डॉ. सेठ म्हणाले.
पाकिस्तानने ‘जैश - ए - मोहम्मद’चा म्होरक्या मसूद अझर, ‘लष्कर-ए-तोयबा’चा प्रमुख हाफिज सईद या संयुक्त राष्ट्रांनी बंदी घातलेल्या दहशतवाद्यांना आश्रय दिला आहे. दहशतवादी संघटनांना पाककडून पाठबळ आणि आर्थिक रसद मिळत आहे तरीही दहशतवादाला पाठिंबा नसल्याचा दांभिकपणा पाकिस्तान करत आहे. दहशतवादामुळे मानवाधिकारांचे सर्वाधिक उल्लंघन होत आहे, याची नोंद संयुक्त राष्ट्रांच्या मानवाधिकार परिषदेने आणि जागतिक समुदायाने घ्यावी, असे आवाहनही डॉ. सेठ यांनी केले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: