Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
शंभर रुपयांचे नाणे लवकरच येणार
ऐक्य समूह
Wednesday, September 13, 2017 AT 11:20 AM (IST)
Tags: na1
5नवी दिल्ली, दि. 12 (वृत्तसंस्था) : दोनशे रुपयांची नवीन नोट आणल्यानंतर आता केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेने शंभर रुपयांचे नाणे चलनात आणण्याचा निर्णय घेतला आहे. तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री व अण्णाद्रमुकचे संस्थापक एम. जी रामचंद्रन आणि कर्नाटक शास्त्रीय संगीतातील प्रख्यात गायिका डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सरकारने शंभर, दहा आणि पाच रुपयांची नवी नाणी आणण्याची घोषणा केली आहे.
शंभर रुपयाच्या नाण्याचे वजन 35 ग्रॅम तर 5 रुपयाच्या नाण्याचे वजन 5 ग्रॅम असेल. या नाण्यांमध्ये 50 टक्के चांदी, 40 टक्के तांबे, 5 टक्के निकेल आणि 5 टक्के झिंक या धातूंचा वापर करण्यात येईल. सध्या बाजारात 1,2, 5 आणि 10 रुपयांची नाणी चलनात आहेत. आगामी काळात यात 100, 5 आणि 10 रुपयांच्या नव्या नाण्यांची भर पडणार आहे. एम. जी. रामचंद्रन (एमजीआर) यांनी 1972 मध्ये द्रविड मुन्नेत्र कळघम या पक्षातून फुटून अखिल भारतीय अण्णाद्रविड मुन्नेत्र कळघम (एआयएडीएमके) या पक्षाची स्थापना केली होती.
एमजीआर यांनी 1977, 1980 व 1984 मध्ये  मुख्यमंत्रिपद भूषवले होते. त्यांच्या आणि कर्नाटक संगीतातील प्रख्यात गायिका डॉ. एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त नवी नाणी आणण्यात येणार आहेत. शंभर रुपयांच्या एका नाण्याच्या पुढच्या भागावर एमजीआर यांची प्रतिमा असेल तर दुसर्‍या नाण्यावर मागच्या बाजूस सुब्बलक्ष्मी यांची प्रतिमा असेल.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: