Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
हाफिज सईदच्या सुटकेला विरोध
ऐक्य समूह
Wednesday, September 13, 2017 AT 11:21 AM (IST)
Tags: mn2
पाकच्या पंजाब प्रांताची न्यायालयात भूमिका
5इस्लामाबाद, दि. 12 (वृत्तसंस्था) : मुंबईवरील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि ‘जमात - उद - दवा’ या बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या हाफिज सईद याची सुटका करण्यास पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने विरोध केला आहे. हाफिजची सुटका केल्यास पंजाब प्रांतात अशांतता निर्माण होईल, असा युक्तिवाद पंजाब सरकारने लाहोर उच्च न्यायालयात मंगळवारी केला.
हाफिज सईदला सध्या पाक सरकारने दहशतवाद प्रतिबंधक कायद्यान्वये नजरकैदेत ठेवले आहे. ही नजरकैद बेकायदेशीर असून आपल्या सुटकेसाठी हाफिजने लाहोर उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. त्याची सुनावणी आज झाली. आपल्या अशिलाची नजरकैद बेकायदेशीर आणि निराधार आहे. त्यामुळे त्याची तातडीने सुटका करावी, अशी मागणी हाफिजचे वकील ए. के. खोकर यांनी केली. अमेरिकेने पाकिस्तानची आर्थिक रसद रोखण्याचा इशारा दिल्यामुळे पाक सरकारने दबावाखाली ही कारवाई केली आहे, असा युक्तिवाद खोकर यांनी केला. मात्र, या प्रकरणात हाफिजच्या वकिलांनी यापूर्वी अमेरिकेच्या दडपणाचा उल्लेख केला नसल्याचे न्यायाधीशांनी निदर्शनास आणून दिले. हाफिजचा हा अर्ज बातम्यांच्या आधारे केल्याचे न्यायाधीश म्हणाले.
पंजाब प्रांताच्या गृह विभागाने हाफिजच्या सुटकेला विरोध करताना आपले लेखी म्हणणे मांडले. हाफिजकडून दहशतवादी संघटनेसाठी निधी गोळा करण्यात येतो. संयुक्त राष्ट्रांमधील अनेक ठरावांचे त्यामुळे उल्लंघन होत आहे. त्याला दहशतवाद प्रतिबंधक कायद्यान्वये नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याच्या संघटनेच्या अनेक सदस्यांविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत.   ‘ईद-उल-अझा’च्या तीन दिवसांच्या कालावधीत ‘जमात-उद-दवा’च्या सदस्यांनी गृह मंत्रालयाचे आदेश डावलून देणग्या गोळा केल्या होत्या. त्याचबरोबर प्रांताच्या मंत्रालयाचे आदेश डावलूनही निधी गोळा केल्याची अनेक प्रकरणे दाखल आहेत. हाफिजची सुटका केल्यास पंजाब प्रांतात अशांतता निर्माण होईल, असा युक्तिवाद पंजाब प्रांताच्या गृह मंत्रालयाने केला. त्यानंतर न्यायालयाने खोकर यांना या प्रकरणात आणखी युक्तिवाद करण्याचे निर्देश दिले. आता या प्रकरणी पुढील सुनावणी 15 सप्टेंबरला होणार आहे. ‘जमात-उद-दवा’ ही ‘लष्कर-ए-तोयबा’ या दहशतवादी संघटनेची मुख्य संघटना आहे. हाफिज सईदला या वर्षाच्या सुरुवातीपासून नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. त्याच्या अटकेसाठी माहिती देणार्‍यास दहा लाख अमेरिकन डॉलर्सचे इनाम अमेरिकन सरकारने जाहीर केले आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: