Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
विमानातील ‘दबंगगिरी’ला बसणार चाप
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:37 AM (IST)
Tags: na3
उपद्रवी प्रवाशांवर किमान दोन वर्षांची बंदी
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : विमानात गैरवर्तन करणार्‍या प्रवाशांना चाप बसवण्यासाठी केंद्र सरकारने ‘नो फ्लाय लिस्ट’साठी तीन प्रकारची वर्गवारी केली असून त्यामध्ये जीवाला धोकादायक असलेले गैरवर्तन केल्यास किमान दोन वर्षांच्या बंदीची कारवाई करण्यात येणार आहे. अन्य दोन पातळ्यांवरील कृत्यांसाठी अनुक्रमे सहा महिने व तीन महिन्यांच्या प्रवासबंदीची कारवाई करण्यात येणार आहे. विमान कंपन्यांचे कर्मचारी आणि प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने ‘नो-फ्लाय लिस्ट’ जारी केली आहे.
तिसर्‍या पातळीवरील गैरवर्तनासाठी सर्वाधिक शिक्षा करण्यात येणार आहे. विमानातील यंत्रणांचे नुकसान, जीविताला धोका होईल असे वर्तन आणि शारीरिक हल्ला या कृत्यांचा त्यामध्ये समावेश आहे. त्यासाठी संबंधित प्रवाशावर दोन वर्षांसाठी विमान प्रवासबंदी करण्यात येईल. दुसर्‍या पातळीवरील गैरवर्तनामध्ये ढकलणे, लाथ मारणे, हाताने मारणे आणि अयोग्य ठिकाणी स्पर्श करणे, या कृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. अशा हल्ल्यासाठी संबंधित प्रवाशावर सहा महिन्यांची बंदी करण्यात येणार आहे. पहिल्या पातळीवरील गैरवर्तनामध्ये अयोग्य हावभाव करणे, शाब्दिक   बाचाबाची करून त्रास देणे आणि मद्यपान करून गैरवर्तन करणे, या कृत्यांचा समावेश करण्यात आला आहे. याबाबत तीन महिन्यांची प्रवासबंदी करण्यात येणार आहे.  निवृत्त जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील स्वतंत्र समिती प्रवाशाचे गैरवर्तन ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये समाविष्ट करण्यासारखे आहे का, याची शहानिशा करेल. गुन्हा घडल्यापासून 30 दिवसांत त्याबाबतचा निर्णय घेण्यात येईल. अशा गुन्ह्यांसाठी सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्याच्या कलमांन्वये कारवाई करण्यात येईल. त्याचबरोबर विमान प्रवासबंदीही करण्यात येईल, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री अशोक गजपती राजू यांनी सांगितले. त्याचबरोबर केंद्रीय गृह मंत्रालयाने एखाद्या विशिष्ट व्यक्तीबद्दल कळविल्यास त्या व्यक्तीचाही ‘नो फ्लाय लिस्ट’मध्ये समावेश करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
ही मार्गदर्शक तत्त्वे पूर्वलक्षी प्रभावाने लागू होणार की यापुढील घटनांबाबत लागू होणार, हे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आलेले नाही. ही बंदी पूर्वलक्षी प्रभावाने लागूझाल्यास शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड आणि तेलगू देसमचे खासदार जे. सी. दिवाकर रेड्डी यांच्यावरही दोन वर्षांची बंदी घातली जाऊ शकते. गायकवाड यांनी मार्च महिन्यात एअर इंडियाच्या कर्मचार्‍यावर हल्ला केला होता तर रेड्डी यांनी जूनमध्ये इंडिगो एअरच्या मालमत्तेची नासधूस केली होती. या घटनांमुळे देशातील बहुतांश विमान कंपन्यांनी दोघांवर प्रवास बंदी घातली होती. काही दिवसांनी ही बंदी हटवण्यात आली होती. त्यानंतर ‘नो फ्लाय लिस्ट’ तयार करण्याबाबत चर्चा झाली होती. प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी ‘नो फ्लाय लिस्ट’ जारी करणारा भारत हा पहिलाच देश आहे, असे केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी सांगितले.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: