Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:15 AM (IST)
Tags: mn2
5मुंबई, दि. 8 (प्रतिनिधी) : राष्ट्रीय महामार्गाची व जिल्ह्यांना जोडणार्‍या रस्त्यांची कामे त्वरित सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील जिल्हाधिकार्‍यांना दिले.
‘वर्षा’ निवासस्थानी राष्ट्रीय महामार्ग व जलसिंचन प्रकल्पाबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आज बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री (सार्वजनिक उपक्रम) एकनाथ शिंदे, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मदन येरावार उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस, केंद्रीय मंत्री गडकरी यांच्यासह मंत्र्यांनी  व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे नागपूर रिंगरोड, पार्डी उड्डाण पूल, पुणे-सातारा रस्ता, खेड-सिन्नर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट रस्ता, पनवेल-इंदापूर चौपदरी रस्ता, सोलापूर-कर्नाटक सीमा रस्ता, सोलापूर-येडशी, येडशी-औरंगाबाद, अमरावती-चिखली, तुळजापूर-औसा, औसा-चाकूर, लातूर बायपास रस्ता, चाकूर-लोहा, लोहा-वारंगा, वारंगा-महागाव-यवतमाळ रस्ता, यवतमाळ-वर्धा, नांदेड-हिंगोली-वाशीम-अकोला मार्ग, गोंडखैरी-कळमेश्‍वर-ढेपेवाडा-सावनेर रस्ता, फगणे-गुजरात-महाराष्ट्र बॉर्डर रस्ता, वणी-वरोरा, औरंगाबाद-धुळे, मुंबई-गोवा महामार्ग, नाशिक-सिन्नर,   मुंबई-वडोदरा महामार्ग, कल्याण-निर्मल-नांदेड या रस्त्यांच्या कामांच्या सद्य स्थितीबाबत संबंधित जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती घेतली. गडकरी म्हणाले, सर्व जिल्हाधिकार्‍यांनी भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी. विरोध करणार्‍या ग्रामस्थांशी चर्चा करून मार्ग काढावा. या कामासाठी निधीची कमतरता भासणार नाही. त्याचबरोबर जमीन किती हस्तांतरित झाली, किती खर्च झाले, किती निधी लागणार आहे, किती महिन्यात काम सुरू होणार, असे प्रश्‍न विचारून त्यांनी जिल्हाधिकार्‍यांकडून माहिती घेतली. राज्याचे मुख्य सचिव सुमित मल्लिक, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रवीणसिंह परदेशी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव आशिषकुमार सिंह उपस्थित होते.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: