Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
सैन्याच्या पोलीस दलात आता महिलांचा समावेश
ऐक्य समूह
Saturday, September 09, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 8 (वृत्तसंस्था) : विविध क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार्‍या भारतीय महिलांना आता लवकरच लष्कराच्या पोलीस दलात नेमण्यात येणार आहे. याबाबत लष्कराने योजनेवर अखेरचा हात फिरवला आहे. लष्करामधील लिंगभेदाचा अडथळा दूर करण्यासाठी 800 महिलांचा समावेश करण्यात येणार आहे.
भारतीय महिला अनेक क्षेत्रांत कार्यरत असून काही क्षेत्रात त्यांनी पुरुषांनाही मागे टाकले आहे. मात्र, संरक्षण दलांमध्ये त्यांना प्रवेश नव्हता. आता हा अथडळाही दूर होणार आहे. काही महिन्यांपूर्वी हवाई दलात महिलांना वैमानिक म्हणून संधी देण्याचा निर्णय झाल्यानंतर लष्कराच्या पोलीस दलातही महिलांना नियुक्त करण्यात येणार आहे. दरवर्षी 52 या प्रमाणे 800 महिलांची लष्करी पोलीस दलात भरती करण्यात येणार आहे. लष्करातील लिंगभेदाचा अडथळा दूर करण्यासाठी हा निर्णय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, असे लेफ्टनंट जनरल अश्‍विनीकुमार यांनी शुक्रवारी सांगितले. लष्करात जवान म्हणून महिलांची भरती करण्याचा विचार असून प्रथम लष्करी पोलीस दलातमहिलांची भरती करून त्याची प्रक्रिया पुढे सुरू   करण्यात येईल, असे लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी जून महिन्यात सांगितले होते. लष्करी पोलीस दलात महिलांची भरती केल्याने लिंगभेदावर आधारित गुन्ह्यांच्या तपासात मदत होणार आहे, असे अश्‍विनीकुमार यांनी सांगितले. सध्या लष्करात वैद्यकीय, शिक्षण, कायदे, अभियांत्रिकी विभाग व सिग्नल यंत्रणा अशा मोजक्या ठिकाणी महिला काम करत आहेत. छावणी व लष्करी तळांची सुरक्षा राखणे, लष्कराचे नियम आणि कायद्याचे उल्लंघन करण्यापासून जवानांना रोखणे, शांतता आणि युद्ध काळात जवान आणि वाहनांची वाहतूक सुरळीत करणे, युद्धकैद्यांना हाताळणे आणि नागरी पोलिसांना गरजेनुसार मदत करणे, ही लष्करी पोलिसांची कामे आहेत.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: