Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
कासवर जोडप्यांना लुटणारे चौघे दोन वर्षासाठी तडीपार
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: lo1
5सातारा, दि. 1 : कास पठारावर एकांतात बसणार्‍या जोडप्यांना लुटणार्‍या चौघांना दोन वर्षासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी तडीपार केले आहे.
तडीपार केलेल्यांची टोळीप्रमुख गणेश जगन्नाथ तांदळे (वय 21), करण पंच्चाहत्तर काळे (वय 21), जॅकी वसंत पवार (वय 23), रवींद्र राजेंद्र गोळे (वय 22, सर्व रा. वस्तादवस्ती, जकातवाडी, ता. सातारा) अशी नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, चार जणांची टोळी कास परिसरात येणारे पर्यटक, प्रेमीयुगल,  निर्जनस्थळी एकांतात बसलेली मुले, मुली यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांना मारहाण करून त्यांच्याकडील सोन्याचे दागिने, मोबाईल हँडसेट, पैसे असे जबरदस्तीने काढून घेत होते. अशा प्रकारचे गुन्हे करून चोरीचा माल विकून आलेल्या पैशातून केवळ ऐशोआराम करणे व विलासी जीवन जगण्याची त्यांना सवय जडलेली आहे. वरील इसम हे अतिशय घातक, धोकादायक असल्याने त्यांच्या गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत दिवसेंदिवस वाढ होत होती. सदरची टोळी कायद्याला न जुमानता अधिकच बेडर झालेली होती. त्यांच्यावर एकत्रात एक दरोडा व 3 मारहाण करून जबरी चोरीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्या अशा प्रकारच्या केलेल्या गुन्ह्यांमुळे कास परिसरात येणार्‍या पर्यटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यांच्यावर वेळोवेळी गुन्हे दाखल करून अटक करून प्रतिबंधात्मक कारवाई करून सुधारणेची संधी त्यांना दिली होती. मात्र त्यांच्या वर्तनात सुधारणा झाली नव्हती. त्यांचा सर्वसामान्य जनतेसउपद्रव होत होता. जनतेमधून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याकरता मागणी होत होती. त्यामुळे या चार जणांना हद्दपार करणेबाबत हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्याकडे सातारा तालुका पोलीस ठाण्याने प्रस्ताव सादर केला होता. त्यांना संदीप पाटील यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 55 अन्वये सातारा, जावली, वाई, कराड तालुका  अशा चार तालुका हद्दीतून दोन वर्ष कालावधीसाठी हद्दपार केले आहे. आदेशाची अंमलबजावणीझाल्यानंतर 48 तासाच्या आत त्यांनी हद्दीबाहेर गेले पाहिजे, असेही आदेशात म्हटले आहे. या कारवाईचे सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. अशाच प्रकारे जिल्ह्यात दहशत पसरवणार्‍या, समाजात बेकायदेशीर कारवाया करणार्‍या टोळ्यांच्या विरोधात तडीपारची कारवाई सुरू आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: