Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
बोफोर्स प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबरमध्ये सुनावणी; काँग्रेस अडचणीत
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:35 AM (IST)
Tags: na3
5नवी दिल्ली, दि. 1 (वृत्तसंस्था) : बहुचर्चित बोफोर्स तोफ खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ऑक्टोबरपासून सुनावणी होणार आहे. भाजप नेते अजय अग्रवाल यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने होकार दिला आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची चिन्हे आहेत.
बोफोर्स तोफ घोटाळ्या प्रकरणी लवकर सुनावणी घ्यावी, अशी मागणी भाजप नेते अजय अग्रवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे केली होती. दिल्ली उच्च न्यायालयाने 31 मे 2005 मध्ये घोटाळ्यातील आरोपींना दोषमुक्त केले होते. मात्र या निर्णयाला सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले नव्हते. केंद्रातील तत्कालीन सरकारने सीबीआयला सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करू दिली नाही, असा दावाही अग्रवाल यांनी केला होता. अग्रवाल यांच्या याचिकेवर शुक्रवारी सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने अग्रवाल यांच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास होकार दिला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा काँग्रेसच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणाची ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात सुनावणी होईल.
भारताने 24 मार्च 1986 रोजी स्वीडनच्या एबी बोफोर्स कंपनीशी 410 हॉवित्झर तोफा खरेदीचा एक हजार 500 कोटींचा करार केला होता. त्यासाठी कंपनीने 64 कोटी रुपयांची लाच दिल्याचा आरोप आहे. सॅम्प्रोगेटी या इटालियन पेट्रोकेमिकल कंपनीचे प्रतिनिधी क्वात्रोची हे या व्यवहारातील मध्यस्थ होते असे सांगितले जाते. 
 क्वात्रोची हे गांधी कुटुंबीयांचे निकटवर्तीय असल्याने राजीव गांधी अडचणीत आले होते. त्यांच्याबरोबरच तत्कालीन संरक्षण सचिव एस. के. भटनागर, हिंदुजा बंधू, एबी बोफोर्सचे दलाल विन चढ्ढा, अमिताभ बच्चन यांचेही नाव या घोटाळ्यात आले होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी क्वात्रोची यांचा 2013 मध्ये मृत्यू झाला होता.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: