Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
चौकीचा आंबा येथे चार दुकाने आगीत खाक
ऐक्य समूह
Saturday, September 02, 2017 AT 11:29 AM (IST)
Tags: re1
बारा लाखांचे नुकसान
5औंध, दि. 1 : चौकीचा आंबा, ता. खटाव येथील चार दुकाने शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाली. आगीत सुमारे बारा लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. शॉर्टसर्किटने ही आग लागल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. पहाटेची वेळ व परिसरात पाणी उपलब्ध नसल्याने ही आग विझविण्यात मोठा अडथळा आला. यावेळी भोसरे, चौकीचा आंबा, कोकराळे येथील सुमारे अडीचशे ते तीनशे लोक घटनास्थळी आग आटोक्यात आणण्यासाठी गोळा झाले होते.
यावेळी ग्रीन पॉवर शुगर्सची अग्निशमन गाडी घटनास्थळी आल्यानंतर आग आटोक्यात आली.
चौकीचा आंबा हे ठिकाण गेल्या पंधरा वर्षांमध्ये पंचक्रोशीतील भोसरे, जायगाव, कोकराळे, अंभेरी, लोणी, धकटवाडी, आंमलेवाडी, जाखणगाव, गादेवाडी व अन्य गावांसाठी महत्त्वाची बाजारपेठ बनले आहे. रहिमतपूर ते वडूज रस्त्यावर भोसरे येथील सुनील गुजर यांचे एस कुमार इलेक्टिक अँड मोबाईल शॉपी नावाचे दुकान, सोमनाथ काळे यांचे अलंकार केस कर्तनालय, सलिम मुलाणी यांचे समीर चिकन शॉप तर धकटवाडी येथील बबन आनंद माने यांचे जय हनुमान ऑटो गॅरेज ही सर्व पत्रा शेडची दुकाने एकमेकांना लागून बारा ते तेरा वर्ष या ठिकाणी आहेत. शुक्रवारी पहाटे पाचच्या सुमारास या दुकानांनी अचानक पेट घेतल्याने दुकानातून आग व धूर निघू लागला. त्यामुळे चौकीचा आंबा येथील नागरिक, महिला घटनास्थळी आले. आगीची माहिती परिसरातील भोसरे, कोकराळे, अंभेरी येथील ग्रामस्थांना समजताच मोठा जमाव त्या ठिकाणी आला. 
परिसरात जवळ कोठेच पाणी उपलब्ध नसल्याने व नागरिकांना दुकानांनी पूर्ण पेट घेतल्यानंतर माहिती मिळाल्यामुळे दुकानातील बहुतांशी साहित्य जळून खाक झाले होते. त्या दरम्यान गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्सची अग्निशमनदलाची गाडी घटनास्थळी आल्यानंतर चारही दुकानातील आग विझविण्यात आली. पण यामध्ये दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक बेचिराख झाले होते. सुमारे दीड ते दोन तास अग्नीचे तांडव सुरू होते.
आगीत सुनील गुजर यांच्या दुकानातील सॅमसंग कंपनीचे झेरॉक्स मशीन, तीन प्रिंटर, एक कॉम्प्युटर, कॅमेरा, दहा टी.व्ही. सेट, मिक्सर, टेप, मोबाईल सेट, रिचार्ज व्हाऊचर, बायोमेट्रिक मशीन, होम थियटर, साऊंड बॉक्स, शासकीय कागदपत्रे, इलेक्ट्रॉनिक मीटर तसेच गणपती उत्सवासाठी आणलेले इलेक्ट्रॉनिक साहित्य, वीजेची उपकरणे असे सुमारे सहा लाख रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. कालच त्यांनी नवीन आणलेला सुमारे तेरा हजार रुपये किंमतीचा प्रिंटर घरी नेल्यामुळे वाचला आहे. तर सोमनाथ काळे यांच्या दुकानातील खुर्च्या, टेबल, काचा, फर्निचर असे सुमारे दीड लाख रुपयांचे साहित्य जळाले, सलीम मुलाणी यांच्या दुकानातील सव्वीस कोंबड्या, लोखंडी पिंजरा, इलेक्ट्रॉनिक वजन काटा, एक एलईडी दूरदर्शन संच, दुकानात नवीन केलेले फर्निचर, बील बुक असे सुमारे सत्तर हजार रुपयांचे साहित्य जळून नष्ट झाले. बबन माने यांच्या दुकानातील कॉम्प्रेसर मशीन, दोन नवीन दुचाकींचे टायर, पन्नास ट्यूब, एक हिटर मशीन, विक्रीसाठी आणलेले स्पेअरपार्ट, सीट कव्हर, ऑईलचे डबे, फर्निचर असे सुमारे चार लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. हे सर्व नुकसान बारा लाख रुपयांच्या आसपास झाले आहे. चारही दुकाने जळून खाक झाल्याने चौकीचा आंबा पंचक्रोशीतून या घटनेबद्दल हळहळ व्यक्त केली जात होती. सदर घटनेच्या नुकसानीची नोंद औंध पोलीस स्टेशनला झाली असून सहाय्यक फौजदार सुधीर येवले तपास करीत आहेत.  आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.
बंब लवकर पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला
आगीने रौद्ररूप धारण केले होते. आग आटोक्यात आणण्यासाठी सर्वांचे प्रयत्न सुरू होते. परंतु ग्रीन पॉवर शुगर गोपूज साखर कारखान्याचा अग्निशामक बंब वेळेवर पोहोचल्याने आग आटोक्यात आणल्याने पुढील अनर्थ टळला, अन्यथा आणखी काही दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली असती.
घटनास्थळी अधिकारी, पदाधिकार्‍यांच्या भेटी
आज दिवसभर खटाव पंचायत समितीचे सभापती संदीप मांडवे, विद्युत वितरण कंपनीचे उपअभियंता बी. बी. घारे, बी. एस. शेडे, मंडलाधिकारी खाडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
युवकांवर बेरोजगारीची कुर्‍हाड
नोकरी मिळत नसल्याने सुशिक्षित बेरोजगार युवकांचा दुकान सुरू करून स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी प्रयत्न सुरू होता. मात्र आगीत मोठे नुकसान झाल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान झाले असून बेरोजगारीची कुर्‍हाड कोसळली आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: