Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुंबईत इमारत कोसळून 22 जणांचा मृत्यू
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:22 AM (IST)
Tags: mn2
चौकशीचे आदेश; जुन्या इमारतींचा प्रश्‍न ऐरणीवर
5मुंबई, दि. 31 (प्रतिनिधी) : मुंबईतील भेंडीबाजार भागातल्या पाकमोडिया स्ट्रीटवरील सुमारे सव्वाशे वर्षांची जुनी ‘हुसैनीवाला’ ही सहा मजली इमारत गुरुवारी सकाळी कोसळली.
या दुर्घटनेत तब्बल 22 जणांचा बळी गेला आहे. अजूनही अनेक लोक ढिगार्‍याखाली असून रात्री उशिरापर्यंत आपत्ती निवारण पथक व अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू होते. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घटनास्थळाला भेट देऊन या दुर्घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मृतांच्या कुटुंबीयांना सरकारकडून प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.  
मुंबईतील भेंडीबाजार भागात पाकमोडिया स्ट्रीटवर हुसैनीवाला ही सुमारे सव्वाशे वर्ष जुनी इमारत होती. मूळ तीन मजली असलेल्या इमारतीवर तीन मजले नंतर बांधण्यात आले होते. आधीच मोडकळीला आलेली ही इमारत मंगळवारच्या मुसळधार पावसामुळे आणखी कमजोर होऊन गुरुवारी सकाळी आठ-साडेआठच्या दरम्यान कोसळली. इमारतीच्या ढिगार्‍याखाली अंदाजे 65 रहिवासी अडकले होते. रात्री आठपर्यंत त्यातील 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. ढिगार्‍याखाली अडकलेल्या 15 जणांना बाहेर काढण्यात आले असून त्यापैकी चौघांना उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफचे 45 जवान आणि अग्निशमन दलाचे जवानांनी स्थानिक रहिवाशांच्या मदतीने बचावकार्य सुरू ठेवले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
ही इमारत 125 वर्षे जुनी आहे. या इमारतीत 9 कुटुंबे राहत होती. इमारतीत 12 रूम आणि 6 गोडाऊन होती. मूळ इमारत तळमजला अधिक तीन मजली होती; पण त्यावर अनधिकृतपणे दोन मजले वाढविण्यात आले होते. हे दोन अनधिकृत मजले बांधूनही 25 वर्षे झाल्याचे स्थानिकांनी सांगितले. इमारतीचा ढिगारा इतर इमारतींवर आदळला. त्यामुळे बाजूच्या तीन इमारतींना तडे गेले आहेत. मात्र, या तिन्ही इमारतींमधील रहिवासी सुखरूप असल्याचं अग्निशमन
दलानं सांगितलं.
चौकशीचे आदेश
दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुपारी घटनास्थळाला भेट देऊन तेथील बचावकार्याची माहिती घेतली. या इमारतीच्या पुनर्वसनाची परवानगी देण्यात आली होती. ज्या विकासकांकडून या इमारतीचा पुनर्विकास केला जाणार होता, त्यांना वर्षभरापूर्वीच जुनी इमारत पडण्याचीही परवानगी देण्यात आली होती. असे असताना ही इमारत का पडली गेली नाही? धोकादायक असल्याचे जाहीर करूनही तेथे काही कुटुंबे कशी राहत होती, याची चौकशी गृहनिर्माण विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांकडून करण्यात येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणाही त्यांनी केली.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: