Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
पहिल्या तिमाहीत ‘जीडीपी’ 5.7 टक्क्यांवर
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:19 AM (IST)
Tags: mn1
नोटाबंदी, ‘जीएसटी’मुळे अर्थव्यवस्थेला धक्का
5नवी दिल्ली, दि. 31 (वृत्तसंस्था) : नोटाबंदीनंतर सर्वच क्षेत्रात आलेली मरगळ आणि ‘जीएसटी’च्या अंमलबजावणीबाबत सुरुवातीला असलेली संभ्रमावस्था यामुळे देशाचा सकल राष्ट्रीय उत्पादन (जीडीपी) वाढीचा दर 2017-18 या आर्थिक वर्षाच्या एप्रिल-जून या पहिल्या तिमाहीत 5.7 टक्क्यांवर घसरल्याने अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसला आहे. गेल्या तीन वर्षांच्या काळातील आर्थिक वृद्धी दराने गाठलेली ही सर्वात खालची पातळी आहे. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीवरून हे स्पष्टझाले आहे. नोटाबंदीनंतरच्या जानेवारी-मार्च या तिमाहीत हाच दर 6.1 टक्के होता.
उत्पादन प्रक्रियेची गती मंदावण्याच्या पार्श्‍वभूमीवर सलग तिसर्‍या तिमाहीत नोटाबंदीचा परिणाम जाणवला आहे. गेल्या आर्थिक वर्षात एप्रिल-जून या तिमाहीत सकल राष्ट्रीय उत्पादन वाढीचा दर तब्बल 7.9 टक्के होता. एका वृत्तसंस्थेने केलेल्या पाहणीत देशातील 30 प्रमुख अर्थतज्ज्ञांनी या आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर 6.6 टक्के असेल, असे भाकीत वर्तवले होते. मात्र, सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार तेवढा दरही गाठता आलेला नाही. दरम्यान, केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही या दराबाबत चिंता व्यक्त केली आहे. मात्र, वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीमुळे अर्थव्यवस्था सुधारेल, असा आशावादही त्यांनी प्रकट केला आहे.
रिझर्व्ह बँकेने बुधवारीच नोटाबंदीबाबत प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवरून विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले असताना आता अर्थव्यवस्थेची गती धीमी झाल्याने सरकारला स्वत:चा बचाव करणे कठीण होणार आहे. गेल्या आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तिमाहीत नोटाबंदीच्या प्रभावामुळे जीडीपीचा दर 6.1 टक्क्यांवर आला होता. या घसरणीची भरपाई पुढील आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत होईल, अशी आशा व्यक्त करण्यात येत होती. मात्र, केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने प्रसिद्ध केलेल्या आकड्यांवर नजर टाकल्यास भारतीय अर्थव्यवस्था नोटाबंदीच्या तडाख्यातून अजूनही सावरली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचबरोबर नव्या कर प्रणालीच्या अंमलबजावणीत निर्माण झालेल्या गोंधळाच्या परिस्थितीमुळेही या दरावर परिणाम झाल्याचे विश्‍लेषण अर्थतज्ज्ञांनी केले आहे. देशात 1 जुलैला वस्तू व सेवा कर ही नवी अप्रत्यक्ष करप्रणाली लागू करण्यात आली. त्यानंतर या प्रणालीच्या अंमलबजावणीत गोंधळ निर्माण झाला होता.
या वर्षीच्या पहिल्या तिमाहीत जीडीपी दरात घसरण झाली असली तरी भारतीय अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगात वाढणार्‍या अर्थव्यवस्थेपैकी एक ठरली आहे. मात्र, चीनच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था काहीशी मागे पडली आहे. याच कालावधीत चीनच्या अर्थव्यवस्थेने 6.9 टक्के विकास दर गाठला आहे. आता भारतीय अर्थव्यवस्था जगातील अर्थव्यवस्थांमध्ये कायम सर्वात वेगवान ठेवण्याचे आव्हान मोदी सरकारपुढे आहे. दरम्यान, या स्थितीबद्दल केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनीही चिंता व्यक्त केली आहे. मात्र, वस्तू व सेवा कराच्या अंमलबजावणीतील गोंधळ आता दूर होत असल्याने अर्थव्यवस्थेची स्थिती सुधारेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला आहे.

© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: