Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
महामार्गावर लूटमार करणारी टोळी गजाआड
ऐक्य समूह
Friday, September 01, 2017 AT 11:27 AM (IST)
Tags: re5
शिरवळ पोलिसांकडून थरारक पाठलाग
5शिरवळ, दि. 31 : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर लोकांना लिफ्ट देण्याच्या बहाण्याने महामार्गावर लूटमार करणार्‍या टोळीला शिरवळ पोलिसांनी थरारक पाठलागानंतर जेरबंद केले आहे. या टोळीने पुणे जिल्ह्यातही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिली आहे.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, संजय नानासाहेब ढमाळ (वय 51, रा. आसवली, ता. खंडाळा) हे व्यवसायाने चालक असून ते सध्या धनगरवाडी येथील टाटा 909 गाडीवर शिरवळ ते मुंबई असे कायमस्वरूपी भाडे करत असतात. त्यांनी ही गाडी दि. 18 रोजी दुपारी तीनच्या सुमारास शिरवळ येथील एका कंपनीत भंगार भरण्यासाठी लावली होती. त्यांनी भरलेली गाडी सायंकाळी पाचच्या सुमारास पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर एका हॉटेलसमोर लावली. त्यानंतर आसवली गावाकडे जाण्यासाठी खंडाळा बाजूकडे जाणार्‍या वाहनांना ते हात करत थांबले होते. त्यांनी एका मोटरसायकलस्वाराला हात करून खंडाळा येथे सोडायला सांगितले. ते मोटरसायकलवर बसून जात असताना   केसुर्डी, ता. खंडाळा येथे मोटरसायकलस्वाराने उड्डाण पुलाखाली गाडी थांबवून ढमाळ यांचा मोबाईल हिसकावून घेत दमदाटी व मारहाण करायला सुरुवात केली. त्याच वेळी आणखी एका मोटरसायकलवरून तीन जण आले. काका आम्ही तुम्हाला वाचवायला आलो आहोत, असे म्हणत त्या तिघांनी ढमाळ यांना मारहाण केली. खिशात असतील तेवढे पैसे काढून द्या, अशी दमदाटीही त्यांनी केली. त्यानंतर त्यांच्या खिशातील 4 हजार 750 रुपये काढून घेऊन या चौघांनी त्यांना पुन्हा गुडघ्यावर आणि हातावर मारहाण केली. त्यानंतर ते चौघेही मोटरसायकलींवरून पळून गेले.
या प्रकरणी ढमाळ यांनी शिरवळ पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवली होती. त्या घटनेनंतर ढमाळ यांनी पुन्हा बुधवारी (दि. 30) सायंकाळी नेहमीप्रमाणे गाडी भरून महामार्गावर हॉटेलसमोर लावली आणि ते घरी जाण्यासाठी वाहनाची वाट पहात तेथे उभे राहिले असता त्यांना लूटमार करणारे चौघे महामार्गावरून जाताना दिसले. त्यांनी लगेचच शिरवळ पोलीस ठाण्याशी संपर्क साधून आपल्याला लूटमार करणारे महामार्गावर दिसल्याचे सांगितले.
ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, उपनिरीक्षक स्मिता पाटील, हवालदार खरात, हजारे, भोईटे, मठपती, अमोल जगदाळे, संतोष ननावरे, स्वप्निल दौंड, धीरज यादव, वैभव सूर्यवंशी यांनी ढमाळ यांना सोबत घेत त्या चौघांचा शोध सुरू केला. ते चौघे दोन मोटरसायकलींवरून शिरवळ ते लोणंद रस्त्याने जात असल्याचे
दिसले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला. पोलिसांनी या चौघांना
भोळी, ता. खंडाळा हद्दीत नीरा नदीच्या कडेला पाण्यात जाऊन शिताफीने जेरबंद केले.
लहू रामभाऊ चव्हाण (वय 24, रा. डोंगरतळा, ता. जित्तूर, जि. परभणी), लक्ष्मण रामभाऊ चव्हाण (वय 26), हेमंत तुकाराम माने (वय 29, रा.  गवळीनगर, पो. गोखळी, ता. फलटण), अमोल गणेश चव्हाण (वय 19, रा. पिंपळगाव, ता. जित्तूर, जि. परभणी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून महामार्गावरील लूटमारीचे अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: