Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

धोनीच्या ‘माईलस्टोन’ त्रिशतकी सामन्याकडे लक्ष
ऐक्य समूह
Thursday, August 31, 2017 AT 11:23 AM (IST)
Tags: sp1
भारत आजमावणार राखीव फळीचा कस
5कोलंबो, दि. 30 (वृत्तसंस्था) : भारत आणि श्रीलंका यांच्यात उद्या कोलंबो येथे होणार्‍या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघ आपल्या राखीव फळीचा कस आजमावण्याची शक्यता आहे. कसोटी मालिकेपाठोपाठ पाच एकदिवसीय सामन्यांची मालिकाही  भारताने विजयाची ‘हॅट्ट्रिक’ करून खिशात घातल्याने उर्वरित दोन सामन्यांना फारसे महत्त्व उरलेले नाही. मात्र, उद्याचा सामना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या देदीप्यमान कारकिर्दीतील त्रिशतकी सामना ठरणार असल्याने त्याच्यावरच सर्वांचे लक्ष केंद्रित राहणार आहे.
कसोटी मालिकेनंतर पहिले तीन एकदिवसीय सामने जिंकून भारताने या मालिका विजयावरही शिक्कामोर्तब केले असले तरी पुढचे दोन सामने जिंकून यजमान लंकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवण्याचा कर्णधार विराट कोहली आणि कंपनीचा इरादा आहे. त्याचबरोबर फलंदाजीत सुधारणा करण्याकडेही संघाचे लक्ष आहे. मागच्या दोन सामन्यांमध्ये मधल्या फळीने कच खाल्ल्यानंतर धोनीने अनुक्रमे भुवनेश्‍वरकुमार व रोहित शर्मा यांच्या साथीत भारताला संकटातून बाहेर काढत विजय मिळवून दिले. लंकेतील फसव्या खेळपट्ट्यांवर हे विजय मिळवताना भारताला संघर्ष करावा लागला.
उद्याचा सामना धोनीच्या कारकिर्दीतील 300 वा एकदिवसीय सामना ठरणार आहे. एकदिवसीय क्रिकेटमधील सर्वोत्तम ‘फिनिशर’ असा नावलौकिक मिळवलेल्या धोनीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला जाणार आहे. सचिन तेंडुलकर (463 सामने), राहुल द्रविड (344), मोहम्मद अझरुद्दीन (334), सौरव गांगुली (311) आणि युवराजसिंग (304) या तीनशे किंवा त्यापेक्षा जास्त सामने खेळणार्‍या भारतीय खेळाडूंच्या पंक्तीत आता धोनी स्थान मिळवणार आहे.
उद्याच्या सामन्यात धोनी दोन विश्‍वविक्रमांचा पाठलाग करणार आहे. या मालिकेपूर्वी धोनी संपला, अशी ओरड सुरू होती. मात्र, गेल्या दोन सामन्यांमध्ये धोनीने प्रचंड दबावाखाली खेळताना नाबाद 45 आणि नाबाद 67 अशा खेळ्या करून टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. जागतिक दर्जाचा ‘फिनिशर’ असलेल्या धोनीच्या या दोन खेळ्या नेहमीसारख्या स्फोटक नव्हत्या तर परिस्थितीची गरज ओळखून फटकेबाजीला मुरड घालत केलेली संयमी फलंदाजी होती. त्यामुळे आवश्यकतेनुसार आपल्या फलंदाजीत बदल करू शकतो, हेदेखील धोनीने दाखवून दिले आहे. आजच्या घडीला भारताचा सर्वोत्तम यष्टीरक्षक असलेल्या धोनी 2019 च्या विश्‍वचषक स्पर्धेसाठीही संघातील आपली दावेदारी या कामगिरीने बळकट केली आहे.
ही मालिका आधीच जिंकल्याने संघातील उर्वरित खेळाडूंना संधी देऊन ‘बेंच स्ट्रेंथ’ आजमावण्याचा कोहलीचा विचार असेल. कुलदीप यादव, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर यांना उर्वरित दोन सामन्यांमध्ये खेळवले जाण्याची शक्यता आहे. लोकेश राहुलसह स्वत: कोहली दोन सामन्यांमध्ये अपयशी ठरला आहे. या दोघांनाही पुन्हा लय गवसणे आवश्यक आहे. एरवी सलामीला खेळणार्‍या राहुलला चौथ्या स्थानावर खेळणे जड जात असल्याचे दिसले आहे. त्याचबरोबर केदार जाधवही लागोपाठ दोन वेळा शून्यावर बाद झाला होता. पहिल्या सामन्यात कोहलीने अप्रतिम फलंदाजी केली होती. त्यामुळे राहुल व केदार यांच्यावर चांगली कामगिरी करण्याचा अधिक दबाव असेल.
केदारच्या जागी मनीष पांडेला खेळवायचे का, याचा विचार संघ व्यवस्थापनाला करावा लागेल. त्याच वेळी केदारमुळे गोलंदाजीचा आणखी एक पर्याय कोहलीला उपलब्ध असल्याचाही विचार करावा लागेल. केदारने या मालिकेत आतापर्यंत तीन बळी घेतले आहेत. त्याचबरोबर वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरलाही संधी मिळते का, ते पहावे लागेल. नेटस्मध्ये सराव करताना ठाकूरची गोलंदाजी भेदक वाटत आहे. मात्र, भुवनेश्‍वरकुमार व जसप्रीत बूमराह हे दोन प्रमुख गोलंदाज चांगली कामगिरी करत असून ते फक्त तीन सामने खेळले आहेत. त्यामुळे त्यांना विश्रांती दिली जाण्याची शक्यता फारच कमी आहे. उर्वरित दोन सामन्यांमध्ये काही खेळाडूंना आळीपाळीने संधी देण्याचे संकेत कोहलीने आधीच दिले आहेत. त्यामुळे कुलदीप यादवला खेळवून युजवेंद्र चहल व अक्षर पटेल यांच्यापैकी एकाला विश्रांती दिली जाऊ शकते.
या मालिकेत यजमान संघापुढे मोठ्या समस्या आहेत. पहिल्या तीन सामन्यांमधील पराभवांमुळे सनथ जयसूर्याच्या अध्यक्षतेखालील निवड समिनीने राजीनामे दिले असून त्यांचे राजीनामे श्रीलंका क्रिकेट मंडळाने स्वीकारले आहेत. मात्र, ही मालिका संपेपर्यंत त्यांच्यावरच संघ निवडीची जबाबदारी देण्यात आली आहे. या समितीच्या निवड प्रक्रियेत सातत्य नसल्याचा फटका संघाला बसत आहे. गेल्या वर्षभरात या निवड समितीने एकदिवसीय क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या तब्बल 40 खेळाडूंच्या निवडी केल्या आहेत. हाच ‘मेरी गो राऊंड’चा खेळ चौथ्या सामन्यापूर्वीही पहायला मिळत आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याला झालेल्या फ्रॅक्चरमुळे दिनेश चंदीमल उर्वरित मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याच्याबरोबर हंगामी कर्णधार चामिरा कपुगेदराही पाठदुखीमुळे खेळू शकणार नाही. नियमित कर्णधार उपुल
थरंगाला एका सामन्यासाठी निलंबित करण्यात आल्याने त्याच्या जागी लसिथ मलिंगा उद्या संघाचे नेतृत्व करणार आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था म्हणून धनंजय डिसिल्वा आणि दिलशान मुनवीरा यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. यजमान संघ आपली पराभूत मानसिकता झुगारुन देऊन उर्वरित दोन सामन्यांमध्ये झुंज देणार का, याची लंकेच्या चाहत्यांना उत्सुकता आहे.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, केदार जाधव, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, जसप्रीत बूमराह, भुवनेश्‍वरकुमार, शार्दुल ठाकूर.
श्रीलंका : लसिथ मलिंगा (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, दिलशान मुनवीरा, लाहिरू थिरीमन्ने, अँजेलो मॅथ्यूज, नीरोशान डिकवेला, कुशल मेंडिस, मिलिंदा सिरीवर्धने, मलिंदा पुष्पकुमारा, अकिला धनंजय, लक्षन संदकन, थिसारा परेरा, वनिंदू हसरंगा, दुष्मंथ चामिरा, विश्‍व फर्नांडो.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: