Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
‘ब्रिक्स’ परिषदेत मोदी सहभागी होणार
ऐक्य समूह
Wednesday, August 30, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: na2
5नवी दिल्ली, दि. 29 (वृत्तसंस्था) : डोकलाम प्रश्‍नावरून चिनी सैन्याबरोबर सुरू असलेला संघर्ष अडीच महिन्यांनी संपुष्टात आल्यानंतर चीनच्या शियामेन शहरात होणार्‍या ‘ब्रिक्स’ देशांच्या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी होणार असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली. ही परिषद 3 ते 5 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे.
डोकलाममधून दोन्ही देशांनी आपापले सैन्य माघारी घेतल्यानंतर मोदींच्या चीन दौर्‍याची घोषणा परराष्ट्र मंत्रालयाकडून करण्यात आली. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून चीनच्या फुजियान प्रांतातील शियामेन येथे होणार्‍या ‘ब्रिक्स’ परिषदेत पंतप्रधान सहभागी होणार आहेत, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे.
‘ब्रिक्स’ परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे म्यानमारचा दौरा करणार आहेत. हा दौरा 5 ते 7 सप्टेंबर या कालावधीत होणार आहे. म्यानमारच्या राष्ट्राध्यक्षांनी मोदींना निमंत्रित केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. मोदी यांनी यापूर्वी ‘आसियान’ परिषदेसाठी म्यानमारची राजधानी नाय पियी तावला नोव्हेंबर 2014 मध्ये भेट दिली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: