Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

विजयरथ सुरू ठेवण्याचा टीम इंडियाचा निर्धार
ऐक्य समूह
Thursday, August 24, 2017 AT 11:33 AM (IST)
Tags: sp1
5पल्लेकले, दि. 23 (वृत्तसंस्था) : कसोटी मालिकेतील निर्भेळ यशानंतर एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना जिंकणार्‍या भारतीय क्रिकेट संघाचा ही विजयी वाटचाल पुढेही सुरू ठेवण्याचा निर्धार आहे. श्रीलंकेविरुद्ध उद्या होणार्‍या दुसर्‍या एकदिवसीय सामन्यात प्रतिस्पर्ध्यांना निर्दयीपणे नामोहरम करण्यासाठी कोहली आणि कंपनी सज्ज आहेे. कसोटी मालिकेत यजमानांना 3-0 ने ‘व्हाईटवॉश’ दिल्यानंतर पहिल्या एकदिवसीय सामन्याही भारताने तब्बल 9 गडी आणि 133 चेंडू राखून विजय मिळवला होता.
श्रीलंकेची कामगिरी इतकी खराब होत आहे, की पहिल्या एकदिवसीय सामन्यानंतर संघाची बस संतप्त चाहत्यांनी अडवली होती. संघाचे प्रमुख प्रशिक्षक निक पोथास यांनी या खराब कामगिरीला संघ व्यवस्थापक असांका गुरुसिंघे यांना जबाबदार ठरवले आहे. गुरुसिंघे यांनी 11 खेळाडूंचा अंतिम चमू निवडताना नको इतका हस्तक्षेप केल्याने कसोटी कर्णधार आणि एकदिवसीय क्रिकेटमधील स्फोटक फलंदाज दिनेश चंदीमलला वगळण्यात आले. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चंदीमल चौथ्या स्थानावर खेळतो. मात्र, एकदिवसीय संघाचा कर्णधार उपुल थरंगाने पहिल्या सामन्यात स्वत:साठी चंदीमलचे स्थान निवडले. एरवी थरंगा सलामीला खेळतो. संघातील इतर खेळाडू व गुरुसिंघे यांनी आपल्यावर आणि थरंगावर कुरघोडी केल्याचे मुख्य प्रशिक्षक पोथास यांनी सामन्यानंतरच्या पत्रकार परिषदेत सांगितले होते. याबाबत निवड समितीचे मुख्य प्रशिक्षक सनथ जयसूर्या यांना विचारले असता, त्यांनी एका इंग्रजी वाक्प्रचाराचा दाखला देत, ही वस्तुस्थिती असल्याचे मान्य केले.
मात्र, त्यामुळे लंकेचा संघ भारतापुढे आव्हान निर्माण करण्यास पुन्हा एकदा असमर्थ ठरल्याची बाब लपून राहिलेली नाही. आयसीसी कसोटी आणि एकदिवसीय मानांकनांवर नजर टाकल्यास भारतीय संघ आणि श्रीलंका यांच्या दर्जातील तफावत लक्षात येते. कसोटी क्रमवारीत भारत अव्वल तर लंका सातव्या स्थानावर आहे तर एकदिवसीय मानांकनात भारत तिसर्‍या आणि लंका आठव्या स्थानावर आहे. कसोटी आणि पहिल्या एकदिवसीय सामन्यातील लंकेची कामगिरी पाहिल्यास हा संघ इतक्या खालच्या स्थानावर का फेकला गेला आहे, ते स्पष्ट होते.
भारतीय संघाने कसोटी मालिकेप्रमाणेच पहिल्या एकदिवसीय सामन्यातही संपूर्ण वर्चस्व गाजवले. सलामीवीर शिखर धवनने 132 धावांची फटकेबाज खेळी करताना लंकेच्या गोलंदाजांचे हाल केले. कर्णधार विराट कोहलीनेही नाबाद 82 धावांची तडफदार खेळी करून त्यात भर घातली. या सामन्यात कोहलीने दोन डावखुर्‍या फिरकीपटूंची किंवा दोन लेगस्पिनरची निवड न करता युजवेंद्र चहल व अक्षर पटेल या डावखुर्‍या लेगब्रेक गोलंदाजांची निवड केली होती. लंकेतील खेळपट्ट्यांची स्थिती पाहता तीन फिरकीपटू खेळवणे शक्य नाही. त्यामुळेच वेगळी शैली असलेल्या कुलदीप यादवला वगळण्यात आले. मनीष पांडे, अजिंक्य रहाणे व शार्दुल ठाकूर यांनाही खेळवण्यात आले नाही. मात्र, दुसर्‍या सामन्यात कोहली अंतिम चमूत काही बदल करतो का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल. आगामी विश्‍वचषक स्पर्धेची तयारी भारताने आतापासूनच सुरू केली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त खेळाडूंना संधी देऊन त्यांचा कस आजमावून पाहता येईल. त्या दृष्टीने फलंदाजीच्या क्रमवारीतही कोहली
काही बदल करतो का, ते पहावे लागेल. फलंदाजीच्या क्रमवारीत बदल केल्यास केदार जाधव आणि लोकेश राहुल यांना फलंदाजीची संधी मिळू शकते. त्याचबरोबर गोलंदाजांमध्येही बदल करता येईल.
श्रीलंकेच्या संघ निवडीवर मात्र प्रश्‍नचिन्ह उपस्थित होत आहे. पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमान संघ 28 षटकांमध्ये 3 बाद 150 अशा सुस्थितीत होता. त्यांच्या वरच्या फळीतील फलंदाजांनी फटकेबाजी केल्याने भारतीय गोलंदाज दबावाखाली होते. मात्र, धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस व नीरोशान डिकवेला हे बाद झाल्यानंतर उर्वरित फलंदाजांनी निराशा केली. त्यामुळे उद्याच्या सामन्यातही या तिघांवर मोठी जबाबदारी आहे. गोलंदाजीतही लंकेने निराशा केली. त्यांच्या गोलंदाजांच्या बोथट मार्‍यामुळे भारतीय फलंदाजांचे काम अतिशय सोपे झाले. शिखर धवन, विराट कोहली अशा दर्जेदार फलंदाजांना रोखण्यासाठी गोलंदाजीही तितकीच धारदार असली पाहिजे. मात्र, लंकेच्या गोलंदाजांकडे पाहता त्यांच्यात ही धमक असल्याचे दिसत नाही. लंकेसाठी या मालिकेतील पुढचे दोन सामने अत्यंत महत्त्वाचे आहेत. हे सामने त्यांना जिंकणे भाग आहे अन्यथा वेस्ट इंडिजचा संघ त्यांना मागे सारून आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पुढे जाईल आणि 2019 च्या विश्‍वचषक स्पर्धेसाठी आपोआप पात्र होईल. त्यानंतर लंकेला पात्रता स्पर्धेत खेळावे लागेल. विश्‍वचषक स्पर्धेसाठी पहिले आठ संघ आपोआप पात्र ठरणार असून त्यासाठी 30 सप्टेंबर ही अंतिम मुदत आहे. त्यामुळे लंकेला अधिक जबाबदारीने खेळावे लागणार असून फलंदाजीच्या क्रमवारीतही स्थैर्य आणावे लागेल. त्या दृष्टीने चंदीमलला बाहेर ठेवणे यजमानांना परवडणारे नाही.
संघ पुढीलप्रमाणे : भारत : विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, लोकेश राहुल, केदार जाधव, मनीष पांडे, अजिंक्य रहाणे, महेंद्रसिंग धोनी, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्‍वरकुमार, जसप्रीत बूमराह, शार्दुल ठाकूर.
श्रीलंका : उपुल थरंगा (कर्णधार), अँजेलो मॅथ्यूज, नीरोशान डिकवेला, धनुष्का गुणतिलका, कुशल मेंडिस, चामरा कपुगेदरा, मिलिंदा सिरीवर्धने, मलिंदा पुष्पकुमारा,
अकिला धनंजय, लक्षन संदकन, थिसारा परेरा, वनिंदू हसरंगा, लसिथ मलिंगा, दुष्मंत चामिरा, विश्‍व फर्नांडो.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: