Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

देवेंद्र झाझरिया, सरदारसिंग यांना खेलरत्न
ऐक्य समूह
Wednesday, August 23, 2017 AT 11:25 AM (IST)
Tags: sp1
हरमनप्रीत कौर, चेतेश्‍वर पुजारा अर्जुन पुरस्काराचे मानकरी
5नवी दिल्ली, दि. 22 (वृत्तसंस्था) : यंदाच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके मिळवणारा देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू सरदारसिंग यांच्या नावांची घोषणा केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने मंगळवारी केली. झाझरिया हा खेलरत्न मिळवणारा पहिलाच पॅरालिम्पिकपटू ठरला आहे. या पुरस्कारासाठी आणखी
एक पॅरालिम्पिकपटू दीपा मलिकचे नाव
चर्चेत होते. त्याचबरोबर अर्जुन,
द्रोणाचार्य आणि ध्यानचंद पुरस्कारांची
घोषणा करण्यात आली आहे. महिला विश्‍वचषक गाजवणारी क्रिकेटपटू
हरमनप्रीत कौर आणि टीम इंडियाच्या कसोटी
संघाचा आधारस्तंभ असलेला चेतेश्‍वर
पुजारा यांना अर्जुन पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
माजी ऑलिम्पिकपटू, अर्जुन पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार आणि ध्यानचंद पुरस्कार विजेत्यांच्या समितीने केलेल्या शिफारशींनुसार केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने यंदाच्या क्रीडा पुरस्कार विजेत्यांच्या नावांची घोषणा केली आहे. निवृत्त न्यायाधीश सी. के. ठक्कर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने भालाफेकपटू देवेंद्र झाझरिया आणि हॉकीपटू व भारतीय संघाचा माजी कर्णधार सरदारसिंग यांची खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस केली होती. ती क्रीडा मंत्रालयाने मान्य केली आहे. झाझरियाने पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदके मिळवण्याची कामगिरी केली आहे. अशी कामगिरी करणारा तो पहिलाच भारतीय पॅरालिम्पिकपटू आहे. सरदारसिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय हॉकी संघाने 2014 मध्ये इंचिऑन येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये सुवर्णपदक तर त्या आधी 2010 मध्ये ग्वांगझू येथे झालेल्या आशियाई स्पर्धांमध्ये कांस्यपदक जिंकले होते. सरदारसिंगला 2015 मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने राष्ट्रकुल स्पर्धांमध्ये दोन वेळा रौप्यपदकही जिंकले होते. 2010 आणि 2011 अशी सलग दोन वर्षे त्याला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या ‘ऑल स्टार’ संघातही स्थान देण्यात आले होते.
खेलरत्न पुरस्काराबरोबरच क्रीडा मंत्रालयाने द्रोणाचार्य पुरस्कारासाठी सात प्रशिक्षकांची आणि अर्जुन पुरस्कारासाठी 17 क्रीडापटूंची निवड केली आहे. भारतीय कसोटी संघाच्या फलंदाजीचा आधारस्तंभ चेतेश्‍वर पुजारा, इंग्लंडमध्ये नुकतीच झालेली महिला क्रिकेट विश्‍वचषक स्पर्धा गाजवून भारतीय संघाला अंतिम फेरीत नेणारी हरमनप्रीत कौर, पॅराअ‍ॅथलीट मरियाप्पन वरुणसिंग भाटी, हॉकीपटू एस. व्ही. सुनील यांचा अर्जुन पुरस्कार विजेत्यांमध्ये समावेश आहे. क्रीडा क्षेत्राच्या विकासात आजन्म योगदान दिल्याबद्दल ध्यानचंद पुरस्कारासाठी भूपेंद्रसिंग (अ‍ॅथलेटिक्स), सईद शाहीद हकीम (फुटबॉल), सुमाराय टेटे (हॉकी) यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडादिनी 29 ऑगस्ट रोजी राष्ट्रपती भवनात होणार्‍या समारंभात या क्रीडापटूंना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. पदक, मानपत्र आणि साडेसात लाख रुपये रोख, असे राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचे
स्वरूप आहे. द्रोणाचार्य, ध्यानचंद
आणि अर्जुन पुरस्कार विजेत्यांना प्रत्येकी पाच लाख रुपये रोख, प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात येणार आहे.
पुरस्कार विजेत्यांची नावे पुढीलप्रमाणे : खेलरत्न पुरस्कार - देवेंद्र झाझरिया (पॅरालिम्पिक), सरदारसिंग (हॉकी).
द्रोणाचार्य पुरस्कार - दिवंगत डॉ. आर. गांधी (अ‍ॅथलेटिक्स), हिरानंद कटारिया (कबड्डी), जी. एस. एस. व्ही. प्रसाद (बॅडमिंटन, जीवनगौरव), ब्रिजभूषण मोहंती (बॉक्सिंग, जीवनगौरव), संजोय चक्रवर्ती (नेमबाजी, जीवनगौरव), रोशनलाल
(कुस्ती, जीवनगौरव).
अर्जुन पुरस्कार - व्ही. जे. सुरेखा (तिरंदाजी), खुशबीर कौर, अरोकिया राजीव (अ‍ॅथलेटिक्स), प्रशांतीसिंग (बास्केटबॉल), लैशराम देवेंद्रोसिंग (बॉक्सिंग), चेतेश्‍वर पुजारा, हरमनप्रीत कौर (क्रिकेट), ओईनाम बेमबेम देवी (फुटबॉल), एस. एस. पी. चौरसिया (गोल्फ), एस. व्ही. सुनील (हॉकी), जसवीरसिंग (कबड्डी), पी. एन. प्रकाश (नेमबाजी), ए. अमृतराज (टेबल टेनिस), साकेत मिनेनी (टेनिस), सत्यव्रत कदियन (कुस्ती), वरुणसिंग भाटी, मरियप्पन (पॅराअ‍ॅथलीट).
ध्यानचंद पुरस्कार - भूपेंद्रसिंग (अ‍ॅथलेटिक्स), सईद शाहीद हकीम (फुटबॉल), सुमाराय टेटे (हॉकी).
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: