Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत सिंधू उपांत्यपूर्व फेरीत
ऐक्य समूह
Wednesday, August 23, 2017 AT 11:31 AM (IST)
Tags: sp2
5ग्लासगो, दि. 22 (वृत्तसंस्था) : भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधूने दुसर्‍या फेरीत दक्षिण कोरियाच्या किम ह्यो मिन हिच्यावर 21-16, 21-14 अशी मात करून स्कॉटलंडमध्ये सुरू असलेल्या जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेची उपांत्यपूर्व फेरी गाठली. सिंधूला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. या स्पर्धेत अन्य भारतीय बॅडमिंटनपटूंनी चांगली कामगिरी केली.
किदम्बी श्रीकांतने पहिल्या दिवशी विजयी सलामी देत दुसर्‍या फेरीत प्रवेश केला. त्यानंतर मंगळवारी ऑलिम्पिक रौप्यपदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि पुरुष खेळाडूंमध्ये साई प्रणित यांनी आपापले सामने जिंकले. सिंधूने किम ह्यो मिनवर 21-16, 21-14 अशी मात केली. या सामन्यात सिंधूने वर्चस्व राखले. पहिल्याच गेममध्ये सिंधूने 8-0 अशी आघाडी घेत किमला बॅकफूटवर ढकलले. हा गेम एकतर्फी होणार, असे वाटत असताना किमने जोरदार पुनरामन केले. मात्र, त्यानंतर सिंधूने अनुभव पणाला लावत सिंधूने 6 गुणांची आघाडी कायम ठेवली होती. अखेरच्या क्षणात किमने सिंधूला चांगली टक्कर दिली. काही सुरेख पॉईंट मिळवत किमने आघाडी भरून काढण्याचा प्रयत्न केला. अखेर सिंधूने पहिला गेम 21-16 अशा फरकाने आपल्या खिशात घातला.
दुसर्‍या गेममध्ये किमने सुरुवातीला सिंधूला चांगली लढत दिली. सिंधू आणि किमच्या गुणांमध्ये अवघ्या दोन ते तीन गुणांचे अंतर होते. मात्र, सिंधूने हळूहळू आघाडी वाढवली. संपूर्ण कोर्टभर आक्रमक फटके लगावत  सिंधूने हा गेम 21-14 असा जिंकत उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. या व्यतिरिक्त साई प्रणित, समीर वर्मा, तन्वी लाड आणि ऋतुपर्णा दास यांनीही आपापले पहिल्या फेरीचे सामने जिंकले. भारताची दुसर्‍या क्रमांकाची बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आपल्या मोहिमेला उद्या (बुधवार) सुरुवात करणार आहे. तिलाही पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: