Dainik Aikya - Published from Satara (Maharashtra,India) Published on,
 
मुख्य पान  >>  खेळ वार्ता  >>  बातम्या

‘फॉलोऑन’नंतर श्रीलंकेचा पाय आणखी खोलात
ऐक्य समूह
Monday, August 14, 2017 AT 11:26 AM (IST)
Tags: sp1
5कँडी, दि. 13 (वृत्तसंस्था) : हार्दिक पांड्या आणि कुलदीप यादव या भारताच्या युवा खेळाडूंमुळे यजमान श्रीलंकेसमोर तिसर्‍या कसोटीत डावाच्या पराभवाचे संकट उभे ठाकले आहे. पांड्याच्या 86 चेंडूंमधील धुवाँधार शतकानंतर कुलदीप यादवच्या फिरकीपुढे लंकेच्या फलंदाजांनी सपशेल नांगी टाकल्याने भारताच्या 487 धावसंख्येसमोर लंकेचा पहिला डाव 135 धावांमध्ये आटोपला. भारताचा कर्णधार विराट कोहलीने फॉलोऑन दिल्यानंतर दुसर्‍या डावातही लंकेच्या डावाची सुरुवात निराशाजनक झाली. सलामीवीर उपुल थरंगा दुसर्‍या डावातही लवकर तंबूत परतला. कुलदीप यादवने चार बळी घेऊन पहिल्या डावात लंकेच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. त्याला मोहम्मद शमी, अश्‍विन व पांड्या यांची उत्कृष्ट साथ लाभली. या कसोटीत पांड्याने अनेक विक्रम आपल्या नावावर केले.
पहिल्या डावात श्रीलंकेची अवस्था
दयनीय झाली. कर्णधार दिनेश चंदीमलचा अपवाद वगळता एकही फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर उभा राहू शकला नाही. सलामीवीर उपुल थरंगा याही कसोटीत अपयशी ठरला. मोहम्मद शमीने तिसर्‍याच षटकात थरंगाला यष्टीरक्षक साहाच्या हाती झेल द्यायला भाग पाडले. त्यानंतर त्याने दुसर्‍या कसोटीतील शतकवीर दिमुथ करुणरत्नेचाही अडसर दूर केला. या दोन धक्क्यांमधून दिनेश चंदीमल आणि कुशल मेंडिस यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र, अश्‍विनचे अप्रतिम क्षेत्ररक्षण आणि कुलदीप यादवच्या समयसूचकतेमुळे मेंडिस धावबाद झाला. त्यानंतर लगेचच
हार्दिक पांड्याने अँजेलो मॅथ्यूजला बाद करत लंकेला चौथा धक्का दिला.
चंदीमलने नीरोशान डिकवेलाच्या साथीत थोडा वेळ किल्ला लढवला. डिकवेलाने काही सुंदर फटके लगावत भारतीय गोलंदाजांनी टाकलेला दबाव झुगारायचा प्रयत्न केला. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 63 धावांची भागीदारी केल्यानंतर कुलदीप यादवने ही जोडी फोडली. त्याने आधी डिकवेलाला आणि नंतर दिलरुवान परेराला माघारी धाडत लंकेला हादरवले. कुलदीपनेच मग मलिंदा पुष्पकुमारा आणि विश्‍व फर्नांडो यांचे त्रिफळे उद्ध्वस्त केले. अश्‍विनने चंदीमलची झुंजार खेळी संपुष्टात आणून नंतर लक्षन संदकनला माघारी धाडल्याने लंकेचा पहिला डाव अवघ्या 37.4 षटकांमध्ये 135 धावसंख्येत संपुष्टात आला. कुलदीप यादवने सर्वाधिक 4 तर मोहम्मद शमी व अश्‍विन यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पांड्यानेही एक बळी घेत अष्टपैलू कामगिरी केली. श्रीलंकेचा संघ उणापुरा एक दिवसही तग धरू शकला नाही. त्यानंतर कोहलीने यजमानांवर ‘फॉलोऑन’ थोपवला. दुसर्‍या डावात उमेश यादवने थरंगाचा त्रिफळा उडवून लंकेला धक्का दिला. दिवसअखेर लंकेने दुसर्‍या डावात 13 षटकांमध्ये 1 बाद 19 धावा केल्या आहेत.
त्या आधी सकाळच्या सत्रात दमदार पुनरागमन करणार्‍या श्रीलंकेच्या गोलंदाजांवर भारतीय फलंदाजांनी पुन्हा कुरघोडी केली. कालच्या 6 बाद 329 धावसंख्येवरून भारताचा पुढचा डाव सुरू झाल्यावर विश्‍व फर्नांडोने वृद्धीमान साहाला लवकर बाद करून भारताला सातवा धक्का दिला. मात्र, हार्दिक पांड्याने कसोटी क्रिकेटमधील आपले पहिले शतक साजरे करत भारताला मोठी धावसंख्या गाठून दिली. त्याने धुवाँधार फटकेबाजी करताना 8 चौकार आणि 7 षटकारांचा पाऊस पाडला. पांड्याने लंकेच्या गोलंदाजांची अक्षरशः पिसे काढताना कुलदीप यादवच्या साथीत अर्धशतकी भागीदारी करत संघाला 400 धावांचा टप्पा ओलांडून दिला. आठव्या विकेटसाठी 62 धावांची भागीदारी केली. लक्षन संदकनने कुलदीप यादव आणि मोहम्मद शमीला बाद करून भारताला धक्के दिले. मात्र, तोपर्यंत भारताने आपली पकड मजबूत केली होती. पांड्याने तळाच्या उमेश यादवला हाताशी धरून चौफेर फटकेबाजी करत शतक साजरे केले. उपहारानंतर लक्षन संदकनने पांड्याला बाद केल्याने भारताचा डाव 487 धावसंख्येवर संपुष्टात आला. हार्दिक पांड्याने 108 धावांची खेळी केली. लंकेकडून लक्षन संदकनने सर्वाधिक 5 बळी घेतले. विश्‍व फर्नांडोने 3, मलिंदा पुष्पुकुमाराने 2 तर लाहिरू कुमाराने 1 बळी घेतला.
पांड्याची विक्रमी खेळी
कसोटी कारकिर्दीतील आपले पहिलेवहिले शतक झळकवणार्‍या अष्टपैलू हार्दिक पांड्याने या खेळीत अनेक विक्रम केले. त्याने एकाच सत्रात शतक ठोकण्याचा पराक्रम करताना 96 चेंडूत 108 धावा केल्या.  पांड्याने आपले अर्धशतक 61 चेंडूतच पूर्ण केले. त्यानंतर त्याने अवघ्या 25 चेंडूत पुढच्या 50 धावा करताना 86 चेंडूत शतकी मजल मारली. आठव्या किंवा त्यानंतरच्या स्थानावर खेळताना पांड्या हा सर्वांत जलद शतक झळकवणारा भारतीय फलंदाज ठरला आहे. उपहार ते चहापान या एकाच सत्रात शतक झळकवणारा तो पहिलाच भारतीय ठरला आहे. या आधी वीरेंद्र सेहवागने वेस्ट इंडिजविरुद्ध 2006 साली उपहार ते चहापान या सत्रात 99 धावा पूर्ण केल्या होत्या.
त्याचबरोबर पांड्याने मलिंदा पुष्पकुमाराच्या एकाच षटकात 26 धावा ठोकून आणखी एका भारतीय विक्रमाला गवसणी घातली. कसोटीमध्ये एका षटकात 26 धावा ठोकणारा तो पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे. यापूर्वी माजी कर्णधार कपिलदेव आणि संदीप पाटील यांच्या नावावर कसोटीत एकाच षटकात सर्वाधिक 24 धावा ठोकण्याचा विक्रम होता. एकाच षटकात सर्वाधिक धावा करण्याचा जागतिक विक्रम मात्र वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराच्या नावावर आहे. तो विक्रम मोडण्यात पांड्या अपयशी ठरला. पुष्पकुमाराच्या या षटकात पांड्याने सलग तीन षटकार ठोकले. त्या आधीच्या दोन चेंडूंवर त्याने सलग चौकार ठोकले होते. मात्र, षटकातील शेवटचा चेंडू वाया घालवल्याने पांड्या विश्‍वविक्रमापासून वंचित राहिला. या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणार्‍यांच्या यादीतही पांड्या चौथ्या क्रमांकावर आला आहे. त्याने या वर्षात एकूण 26 षटकार ठोकले आहेत. या वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणार्‍या फलंदाजांच्या यादीत इंग्लंडचा अयॉन मॉर्गन (33) पहिल्या, एव्हिन लुईस (32) दुसर्‍या तर बेन स्टोक्स (27) तिसर्‍या क्रमांकावर आहे. या कसोटीत लंकेच्या नावावरही नको असलेला विक्रम जमा झाला आहे. त्यांचा एक डाव उणीपुरी 40 षटकेही चालू शकला नाही. 50 किंवा त्यापेक्षा कमी षटकांमध्ये डाव गुंडाळला जाण्याची नामुष्की लंकेवर तिसर्‍यांदा ओढवली.
धावफलक : भारत (पहिला डाव) : (6 बाद 329 वरून पुढे) वृद्धीमान साहा झे. परेरा गो. फर्नांडो 16, हार्दिक पांड्या झे. परेरा गो. संदकन 108, कुलदीप यादव झे. डिकवेला गो. संदकन 26, मोहम्मद शमी झे. व गो. संदकन, उमेश यादव नाबाद 3, अवांतर 24, एकूण 122.3 षटकांत सर्वबाद 487.
गोलंदाजी : विश्‍व फर्नांडो 26-3-87-2, लाहिरू कुमारा 23-1-104-0, दिमुथ करुणरत्ने 7-0-30-0, दिलरुवान परेरा 8-1-36-0, लक्षन संदकन 35.3-4-132-5, मलिंदा पुष्पकुमारा 23-2-82-3.
श्रीलंका (पहिला डाव) : दिमुथ करुणरत्ने झे. साहा गो. शमी 4, उपुल थरंगा झे. साहा गो. शमी 5, कुशल मेंडिस धावबाद 18, दिनेश चंदीमल झे. राहुल गो. अश्‍विन 48, अँजेलो मॅथ्यूज पायचित गो. पांड्या 0, नीरोशान डिकवेला यष्टीचित साहा गो. कुलदीप यादव 29, दिलरुवान परेरा झे. पांड्या गो. कुलदीप यादव 0, मलिंदा पुष्पकुमारा त्रि. गो. कुलदीप यादव 10, लक्षन संदकन झे. धवन गो. अश्‍विन 10, विश्‍व फर्नांडो त्रि. गो. कुलदीप यादव 0, लाहिरू कुमारा नाबाद 0, अवांतर 11, एकूण 37.4 षटकांत सर्वबाद 135.
गोलंदाजी : मोहम्मद शमी 6.5-1-17-2, उमेश यादव 3.1-0-23-0, हार्दिक पांड्या 6-1-28-1, कुलदीप यादव 13-2-40-4, रविचंद्रन अश्‍विन 8.4-2-22-2.
श्रीलंका (दुसरा डाव) : दिमुथ करुणरत्ने नाबाद 12, उपुल थरंगा त्रि. गो. उमेश यादव 7, मलिंदा पुष्पकुमारा नाबाद 0, अवांतर 0, एकूण 13 षटकांत 1 बाद 19.
गोलंदाजी : मोहम्मद शमी 4-2-7-0, रविचंद्रन अश्‍विन 6-4-5-0, उमेश यादव
2-0-3-1, कुलदीप यादव 1-0-4-0.
© Copyrights 2014 Dainik Aikya.com - All rights reserved.
of
Powered By: